www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील माहुल कोळीवाड्यातील कोळी बांधवांची एका बंगाली सोनाराने जबरदस्त फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ऐन नारळी पौर्णिमेला कोळी बांधवांवर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. उत्तम माला हा सोनार कोळ्यांचे ७ किलो सोनं आणि ४५ लाख रुपयांची रोकड घेऊन फरार झाला आहे.
२००८ सालापासून कोळीवाड्यात उत्तम माला म्हणजे राजूभाई या सोनाराचं दुकान होतं. तेव्हापासून कोळी बांधवांसाठी तऱ्हे तऱ्हेचे दागिने बनवण्याव्यतिरिक्त आर्थिक मदतही तो करत असे. यातून त्याने कोळी लोकांचा विश्वास मिळवला. गेल्या पाच वर्षांत त्याने कुठलाही गैरव्यवहार न करता कोळ्यांशी संबंध वाढवले.
यानंतर तुमच्या दागिन्यांसारखे आणखी दागिने करायचे आहेत असं सांगून तर हॉलमार्क कंपनीसाठी दागिने बनवायचे आहेत अशी अनेक कारणं सांगून राजूभाईने ९० कोळी बांधवांना गंडा घातला. विविध कारणं सांगून त्यांच्याकडील दागिने राजूभाईने मिळवले. आठवडाभरात तुमचे दागिने तुम्हाला परत देतो असं सांगून अचानक मुंबईतील आपलं दुकान बंद करून तो पळून गेला.
४० तोळे, २५ तोळे, ३५ तोळे असे एकेकाकडून दागिने घेत सुमारे ७५० तोळ्यांचे दागिने आणि ४५ लाख रुपयांची रोकड घेऊन राजूभाईने पत्नी आणि मुलासहित पळ काढला. मुलाच्याच दप्तरात दागिने, कागदपत्रं आणि पैसे ठेवून सर्व दागिने घेऊन पळून गेल्याचं सांगण्यात येत आहे. नारळी पौर्णिमेपर्यंत दागिने परत देऊन, असं आस्वासन देऊन राजूभाईने ९० कोळी बांधवांना हातोहबात फसवले. या घटनेमुळे माहुल कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेला दुछखाचं वातावरण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.