www.24taas.com, मुंबई
अजमल कसाबला फासावर लटकवणार हे निश्चित झालं होतं. पण ही फाशी कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुप्त पद्धतीनं देण्यात आली. साहजिकच, या गुप्ततेचा भंग होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांना कमालीची काळजी घ्यावी लागली. ही गुप्तता एवढी प्रचंड होती की, खुद्द येरवडा तुरुंगातील ज्या जल्लादानं कसाबला फासावर चढवलं त्यालादेखील प्रत्यक्ष क्षणापर्यंत याची कल्पना नव्हती की तो नक्की कुणाला फाशी देणार आहे.
२००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबला सापडल्यापासूनच आर्थर रोडमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण, त्याच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी मात्र पुण्यातील येरवडा तुरुंगात होणार होती. त्यासाठी कसाबला पुण्याला हलवावं लागणार होतं. यासाठी सुरक्षा यंत्रणांनी १८ नोव्हेंबर संपण्याची आणि १९ नोव्हेंबर उजाडण्याची वेळ निवडली.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रान्च, कमांडोज् ऑफ क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) तसंच आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांवर कसाबला पुण्याला पोहचवण्याची जबाबदारी होती. ही संपूर्ण टीम २००८ पासूनच कसाबच्या देखरेखीसाठी तैनात करण्यात आली होती. याच टीमबरोबर १९ नोव्हेंबरला पहाटेच कसाबला येरवडा तुरुंगात दाखल करण्यात आलं.
येरवडा तुरुंगात दाखल होणाऱ्या या नव्या आरोपीची ओळख मात्र गुप्त ठेवण्यात आली होती. येरवडा तुरुंग अधिक्षकाशिवाय ही गोष्ट कुणालाच माहित नव्हती, ना जेलच्या इतर अधिकाऱ्यांना... ना डॉक्टरांना...
‘जेलच्या अधिकाऱ्यांना फक्त एव्हढंच सांगण्यात आलं होती की, कुणीतरी हाय-प्रोफाईल आरोपी येरवड्यात येणार आहे. नक्की कोण आहे हे मात्र सांगण्यात आलं नव्हतं. यावेळीही आईटीबीपी अधिकाऱ्यांच्या संरक्षणात एका अंडाकृती सेलमध्ये कसाबला ठेवण्यात आलं होतं. तुरुंगाच्या जल्लादालाही आम्ही एव्हढंच सांगितलं होतं की, एका दहशतवाद्याला फाशी द्यायची आहे. प्रत्यक्ष फाशी देण्याच्या काही मिनिटे अगोदर त्याला हे सांगितलं गेलं की तो कसाबच आहे’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.
फाशी देण्याच्या अगोदर अंतिम इच्छेबद्दल कसाबला विचारलं तेव्हा त्यानं नकारात्मक उत्तर देऊन आपली काहीही अंतिम इच्छा नसल्याचं म्हटलं. थोड्याच वेळात त्याला फासावर चढवण्यात आलं आणि तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी कसाब मृत झाल्याचं घोषित केलं आणि मग ही बातमी सरकारी यंत्रणांना कळवण्यात आली.