www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईसह कोकण किणारपट्टीवर आज समुद्राला उधाण आले. समुद्राच्या उंच लाटाने दादर, वरळी या ठिकाणी पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात भरतीचा तडाखा बसला. रत्नागिरीत मिरकरवाडा बंदराला पाण्याचा तडाखा बसला.
मुंबईत समुद्राला उधाण आलंय.. लाटांचा तडाखा मुंबईला बसलाय. किनारपट्टीलगत असलेल्या शहराच्या महत्त्वाच्या भागात आज पाणी शिरलं.. वरळ सी फेस, गेट वे ऑफ इंडिया या भागात रस्त्यावर पाणी शिरलं.. पाणी शिरल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती..
समुद्राचं हरपलं भान...
मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर आज समुद्राला उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळालं. भरतीच्या वेळी आलेलं उधाण एवढं गंभीर होतं की समुद्रात उंच उसळलेल्या लाटा दादर माहिम वरळी या किनारपट्टीलगत असलेल्या विभागात रस्त्यावर पाणी शिरलं.. दुपारी 11.31 वाजता आलेल्या भरतीच्या लाटा 4.56 मीटर एवढ्या उंच होत्या.. वरळी सीफेस, शिवाजी पार्क परिसरात शिरलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याचं चित्र होतं. हे पाणी तातडीने परतवण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली होती. वरळी सी फेसवरही भरतीच्या लाटा 4.56 मीटर एवढ्या उंच होत्या.
राज ठाकरेंनी केली पाहणी
पाणी दादरमध्ये शिरल्याचं वृत्त समजताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीने परिसरात धाव घेतली. त्यांनी या पाणी शिरलेल्या भागाची पाहणी केली. दरम्यान दुपारी अकरा वाजून एकतीस मिनिटांनी आलेल्या भरतीच्या या लाटांचं पाणी थेट शहराच्या काही भागात शिरल्यामुळे दादरच्या शिवाजीपार्क भागात पाणी शिरलं. समुद्राचं पाणी अगदी कॅडलरोड भागापर्यंत पोहोचलं होतं. रस्त्यावर पाणी साचल्याने शिवाजी पार्कमध्ये वाहतूक कोंडी झाली. भरतीचे पाणी ओसरेपर्यंत रस्त्यावर पाणी कायम होते.
‘गेट वे’वरची गर्दी मात्र ओसरली...
समुद्रात आलेल्या या उधाणाचं पाणी मुंबईच्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरातही पाणी शिरलं. पाण्याची पातळी एवढी वाढली होती की ‘गेट वे ऑफ इंडिया’ला लागून असलेल्या भिंतीच्या वरून पाणी थेट रस्त्यावर शिरत होतं.. गेटवेसमोरचा मोकळा भाग आणि ताजमहाल हॉटेलबाहेरचा रस्ता यावर आलेल्या या पाण्यामुळे गेटवे ऑफ इंडिय़ाची वास्तू पाण्यात उभी असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं... गेटवे परिसरात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. पण आज थेट रस्त्यावर येत असलेल्या पाण्यामुळे या भागातल्या पर्य़टकांनीही समुद्रापासून दूर राहणंच पसंत केलं.
कोकण किनारपट्टीलाही फटका
कोकण किनारपट्टीलाही समुद्राच्या लाटांचा तडाखा बसलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात समुद्राला उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर धोक्याचा इशारा देण्यात आलाय. देवबाग किनारपट्टीला याचा सर्वाधिक फटका बसलाय. रिसॉर्ट आणि घराचं नुकसान झालंय. दुसरीकडे रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराच्या जेटी परिसरातही सागरी लाटांचा तडाखा पाहायला मिळतोय. लाटांच्या तडाख्याने बोटी एकमेंकांवर आदळून नुकसान झालंय. बोटीचं नुकसान टाळण्यासाठी मच्छिमारांची धावपळ सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.