सिनेमाच्या तिकिटासाठी हत्या!

सिनेमाच्या तिकीट रांगेवरून झालेल्या वादात अजय खामकर या तरुणाची हत्या झालीय. मुंबईतल्या भारतमाता थिएटरबाहेर हा प्रकार घडलाय. हल्लेखोर अशोक चव्हाण याला पोलिसांनी अटक केलीय. बालक पालक हा सिनेमाच्या रांगोत उभं असताना त्यांच्यात वाद झाला होता

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 14, 2013, 08:27 PM IST

www.24taas.com, मुंबई
सिनेमाच्या तिकीट रांगेवरून झालेल्या वादात अजय खामकर या तरुणाची हत्या झालीय. मुंबईतल्या भारतमाता थिएटरबाहेर हा प्रकार घडलाय. हल्लेखोर अशोक चव्हाण याला पोलिसांनी अटक केलीय. बालक पालक हा सिनेमाच्या रांगोत उभं असताना त्यांच्यात वाद झाला होता.
मुंबईतल्या भारतमाता थिएटरमध्ये बालक- पालक सिनेमा सुरू आहे. त्या सिनेमाच्या तिकिट रांगेत हे दोघेही उभे होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर अशोक चव्हाण या ५५ वर्षीय गृहस्थानं अजय खामकरची हत्य़ा केली. रांग मोडल्याच्या कारणावरून अजय आणि अशोक यांच्यामध्ये भांडणाला सुरुवात झाली होती. सुरुवातीची शाब्दिक बाचाबाची बघताबघता हाणामारीवर उतरली. यावेळी रागाच्या भरात अशोक चव्हाणने जवळच असलेल्या नारळ पाणीवाल्याच्या दुकानातील चाकू घेऊन तो अजय खामकरच्या पोटात खुपसला. हा घाव वर्मी लागल्याने अजय जागीच कोसळला. काही वेळातच त्याला वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले. पण, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं उपचाराआधीच अजयचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली आणि एकच हल्लकल्लोळ उडाला. त्यावेळी जवळच्या सिग्नलवर ड्युटीवरअसलेल्या वाहतूक पोलिसांनी तिथे धाव घेऊन आरोपी अशोक चव्हाणला ताब्यात घेतले . त्याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे .