मुंबई : मुख्यमंत्री केवळ मराठा आरक्षणावर बोलत आहेत... त्यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दलही सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असं म्हणत सरकार दुजाभाव करत असल्याचा एकप्रकारे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय.
‘कोर्टानं मराठा आणि मुस्लिम अशा दोन समाजाच्या आरक्षणाबद्दल निर्णय दिलाय... सोबतच, मुस्लिम आरक्षणामध्ये शिक्षणाबद्दल पुनर्विचार करावा असंही सुचवलंय... पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र केवळ मराठा आरक्षणाबद्दल बोलत आहेत.. मुस्लिम आरक्षणाबद्दल मात्र त्यांनी बोलणं टाळलंय...’ असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केलाय.
‘मुख्यमंत्र्यांची भूमिका मराठा आणि मुस्लिम दोन्ही समाजाबद्दल एकच भूमिका घ्यायला हवी... दोन समाजासाठी दोन वेगवेगळ्या भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यायला नकोत... त्या दृष्टीनं ते बोलले तर त्यांच्यावर विश्वास ठेवता येईल’ असंही मलिक यांनी म्हटलंय.
राणे समितीच्या सगळ्या शिफारशी रद्द करत उच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला पूर्णत: स्थगिती दिलीय. तर मुस्लिमांच्या बाबतीत शिक्षणा आणि नोकरीच्या बाबतीत पुन्हा एकदा सरकारनं विचार करावा, असा सल्ला सरकारला दिलाय. त्यानंतर ‘मराठा आरक्षण टिकायलाच हवं... मराठा आरक्षण टिकण्यासाठी गरज पडली तर सुप्रीम कोर्टातही जाणार... तसंच आरक्षण देताना काही तांत्रिक त्रुटी दाखवल्या असतील तर नागपूरच्या अधिवेशनात दूर करण्याचा प्रयत्न करू’ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्याबद्दल नवाब मलिक बोलत होते.
उल्लेखनीय म्हणजे, निवडणुकीपूर्वी ‘आघाडी सरकारनं जाहीर केलेलं आरक्षण टिकणार नाही... हे योग्य नाही’ अशी भूमिका घेतलेल्या भाजपचे नेत्यांनी त्यावेळी सावध भूमिका घेतली होती... मुस्लिमांना दिलेलं आरक्षण रद्द करणार का? याबद्दलही स्पष्ट भूमिका मांडणं त्यांनी टाळलं होतं... परंतु, आता सत्तेत आल्यानंतर न्यायालयासमोर भाजप सरकारला न्यायालयात आपली बाजू मांडावी लागणार आहे... त्यानंतर नव्या सरकारची आरक्षणाबद्दल खरी भूमिका समोर येईल, असं म्हटलं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.