www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमधल्या गोदापार्कच्या भूमिपूजनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरुन कौतुक केलं. गडकरी हे प्रगतीचा विचार करणारे आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी गडकरींची स्तुती केली तर गडकरींनीही राज ठाकरेंचं कौतुक केलं, त्याचवेळी चांगल्या कामात राजकारण नको, असं सांगायलाही गडकरी विसरले नाहीत.
नितीन गडकरी यांच्याकडे विकासाची दुरदृष्टी असल्याने त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. तर, गडकरी यांनी राज्यात बहुतेक शहरांमधून नद्या जातात त्या शहरांसाठी गोदापार्क उत्तम उदाहरण ठरेल असा आशावाद व्यक्त करत राज यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने गोदातीरी उभारल्या जाणाऱ्या गोदापार्कचे नुतनीकरण व भूमिपुजन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या हस्ते आज झाले. यावेळी नितीन गडकरी, राज ठाकरे, रिलायन्स फाऊंडेशनचे वरिष्ठ अधिकारी जगन्नाथ कुमार, प्रमोद जैन, महापौर ऍड. यतीन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
राज यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता हे दोन्ही नेते एकत्र आल्याने राजकीय चर्चा रंगली आहे. गडकरी हे नाशिकला कार्यक्रमानिमित्त येत आहे हे कळाल्यानंतर त्यांनीही भूमिपुजनाला उपस्थित राहावे यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला त्याला त्यांनी तत्काळ होकार दिला. आता त्यांनी होकार का दिला याची मला कल्पना आहे असे सांगताना राज यांनी गडकरींच्या काळात झालेल्या विकासकामे मांडली.
गोदापार्क नाशिककरांची प्रॉपर्टी असल्याचा निर्वाळा देताना महापालिकेला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रकल्प साकारला जाणार आहे. पक्षापेक्षा प्रकल्प महत्वाचा आहे. नितीन गडकरी यांनी गोदापार्क मुळे रोजगाराची संधी प्राप्त होईल असे सांगताना शासनाच्या पर्यटन धोरणावर टीका केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.