अहमदनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. पाण्याच्या प्रश्नावर भाजप आमदार राम शिंदे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन राम शिंदे यांना ताब्यात घेतलं यावेळी पोलीस आणि शिंदे यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली.
अहमदनगर जिल्ह्यात पाणीप्रश्न चांगलाच पेटलाय. शेतक-यांनी मुळा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांचे दरवाजे उघडून पाणी सोडलयं. सकाळी रास्ता रोको करणा-या सर्वपक्षीय आंदोलकांनी दुपारी कालव्याच्या चौक्यांचा ताबा घेतला, तिथली कुलूपं तोडून त्यांनी पाणी सोडून दिलयं.
अहमदनगर जिल्ह्यातल्या धरणातील पाण्यावर स्थानिक शेतक-यांची गरज भागवावी अशी मागणी शेतक-यांनी केलीये. तत्पूर्वी राहुरीत पाणीप्रश्नावर रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. राहुरी तालुक्यातील नगर मनमाड रस्त्यावरील मुळा नदीच्या पुलावर हा रास्ता रोको करण्यात आला.
स्थानिक शेतक-यांची पाण्याची गरज पूर्ण करा आणि त्यानंतरच पाणी जायकवाडी धरणात सोडा अशी मागणी आंदोलकांनी केलीये. मुळा आणि भंडारदरा धराणातून पाणी सोडताना नदी पात्रातल्या कोल्हापुरी बंधा-यांवर तीन फळ्या टाकून पाणी अडवण्यात यावं, भंडारदरा धरणाच्या उजव्या आणि मुळाच्या डाव्या कालव्यातून शेतीला तीन आवर्तनं पाणी द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
थेट जायकवाडीत पाणी सोडल्यास हजारो एकरांवरील पिकं धोक्यात येणार आहेत. जायकवाडीत उद्या आणि परवा पाणी सोडण्यात येणार आहे. परिसरातल्या शेतीला पाण्याचा एकही थेंब मिळणार नाहीए. सोमवारीही नगर मनमाड रस्त्यावरच्या साईबाबा कॉर्नरवर रास्ता रोको केला.