www.24taas.com , झी मीडिया, पुणे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना काही दिवसांपासून धमकीचे फोन येत असल्याची माहिती अंनिसचे प्रदेशाध्यक्ष अविनाश पाटील यांनी झी मीडिला दिलीय. त्यामुळं हा पूर्वनियोजित कट असल्याचं बोललं जातंय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचं बक्षिस देण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज जाहीर केलं. तर दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडं सोपविण्यात आल्याची, माहिती राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलीय.
आज सकाळी साडेसातच्या सुमारास डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ते मॉर्निंग वॉकला गेले असताना ओंकारेश्वर पुलाजवळ 2 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर एकूण चार राऊंड फायर केले गेल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. दोन गोळ्या त्यांच्या शरीराच्या आरपार गेल्या. हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
दाभोलकर यांच्या शर्टाच्या खिशात एक छायाचित्र आणि दोन धनादेश होते. दादर ते पुणे प्रवासाचं एक तिकीटही होतं. त्यावरूनच `साधना` साप्ताहिकाच्या मंडळींनी त्यांची ओळख पटवल्याचं त्यांनी सांगितलं. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारे हल्लेखोर २५ ते ३० या वयोगटातील असल्याची माहितीही त्यांनी दिली. हल्लेखोरांपैकी एकानं टोपी घातली होती आणि दुसऱ्याच्या पाठीवर बॅग होती. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून ते रविवार पेठेच्या दिशेनं पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. स्प्लेंडर बाईकवरून पसार होताना त्यांना एका वाटसरूनं पाहिलं आहे आणि त्यांच्या बाईकचा नंबरही टिपलाय. त्या आधारंच पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं.
सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेलंय. त्यांच्या जाण्यानं अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीची आणि महाराष्ट्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.