www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी आज पुण्यातलं भाषण सर्वात महत्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरे यांच्यासाठी टोलचा मुद्दा सर्वात मोठा आणि महत्वाचा मानला जात असला, तरी राज ठाकरे पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतील का? याकडे मनसे, सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागून आहे.
कारण राज ठाकरे यांनी आतापर्यंत त्यांच्या जाहीर सभांमधून नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. गुजरात दौरा केला, आणि महाराष्ट्राच्या नेत्यांनी मोदींपासून काहीतरी शिकावं, असा सल्ला वजा टोमणाही वेळोवेळी लगावलाय.
मोदी कधी गोड, आज तिखट
यावरून भाजप आणि मनसे राजकारणात का असेना पण जवळचे मित्र होतील असं वाटत होतं, मात्र शिवसेनेचा चिरंतन पुरातन मित्र समजल्या जाणाऱ्या भाजपने मनसेशी निवडणुकाजवळ येऊनही, आधी होतं तेवढंच अंतर ठेवलं आहे.
या दरम्यान अचानक, राज ठाकरे यांनी आपली तोफेची दिशा बदलून नरेंद्र मोदींवर टीका केली. `मुंबई हे गुजराथी लोकांचं माहेर आहे`, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.
यावर उत्तर देतांना राज ठाकरे म्हणाले होते, `मुंबई हे गुजराथी लोकांचं माहेर आहे`, असं मोदी म्हणतात, `तर मुंबई काय मराठी माणसांचं सासर आहे काय?`, असा सवाल राज ठाकरे यांनी मोदींना केला होता.
राज यांच्यावरील टीका
तसेच मुंबईत येऊन नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांचं नाव देखिल घेतलं नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावर `बाळासाहेबांची एवढीच चिंता होती, तर बाळासाहेब हयात असतांना त्यांना राज का सोडून गेले?`, असा सवाल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना केला होता. यावर राज ठाकरे काय उत्तर देतील याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे.
पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधाचा मुद्दा
मुंबई प्रेस क्लबमध्ये शिवसैनिकंनी इंडो-पाक कलाकारांचा पत्रकार परिषदेत गोंधळ घातला, पाकिस्तानच्या भारतविरोधी भूमिकेमुळ शिवसेनेने हे आंदोलन केल्याचा दावा केला.
मात्र हा मुद्दा मनसेने आधीपासून लावून धरल्याचा दावा मनसे नेत्यांनी केला होता. यावरही राज ठाकरे आपल्या भाषणातून टीका करतील का, याकडेही मनसे आणि शिवसैनिकांचं लक्ष लागून आहे.
काँग्रेस - राष्ट्रवादीसाठीही सभा महत्वाची
राज ठाकरे यांची सभा ही विरोधकांसाठीही महत्वाची आहे. यात शिवसेना नव्हे, तर काँग्रेस - राष्ट्रवादीसाठीही राज यांची सभा महत्वाची आहे.
कारण नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा वाढल्यानंतर राज ठाकरे यांच्या नावाची चर्चा, मोदींच्या तुलनेत कमी झाली आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ही बाब काँग्रेस - राष्ट्रवादीसाठीही चिंतेची आहे.
कारण मोदी नावाचं वादळ थांबवण्यासाठी, काँग्रेस-राष्ट्रवादीला शहरी भागात राज यांचा झंझावत तेवढाच मदतीचा ठरण्याची शक्यता आहे. म्हणूनच की काय उशीरा का होईना, राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेच्या जागेची काळजी राष्ट्रवादीने घेतली असावी.
राज यांची सभा कलाटणी देणारी ठरेल का?
राज ठाकरे यांच्या सभांचा इतिहास काही मोठा नाही, मात्र महत्वाचा आहे हे निश्चित, कारण राज ठाकरे यांच्या विक्रोळीच्या सभेतील वादग्रस्त भाषणानंतर, त्यांना अटक झाली आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. त्यावेळी राज ठाकरे युवकांचे ताईत बनले होते. ते एका सभेनं आणि त्यानंतर झालेल्या कारवाईने घडून आलं होतं.
राज ठाकरे यांच्यावर नुकतीच टोल नाक्यांवरून प्रक्षोभक भाषण केल्याची तक्रार आहे. जर पुण्यातलं राज यांचं भाषण वादग्रस्त ठरलं, आणि अटकेची वेळ आली, तर राज यांचं हे भाषण राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारं, आणि लोकसभेच्या मतांच्या समीकरणांना धक्का देणार ठरण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.