मुंबई : इंग्लंडविरुद्धची वनडे सीरिज भारतानं 2-1नं जिंकली आहे. या वनडे सीरिजमध्ये धावांचा जसा पाऊस पडला तसाच रेकॉर्डचाही पाऊस पडला आहे. अनेक विश्वविक्रम या सीरिजमध्ये झाले आहेत.
- या सीरिजमध्ये दोन्ही टीमनी मिळून एकूण 2090 रन बनवण्यात आल्या. तीन मॅचच्या कोणत्याही सीरिजमध्ये झालेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे. याआधी 2007च्या अॅफ्रो-एशिया कपमध्ये 1892 धावा बनवण्यात आल्या होत्या.
- केदार जाधवनं या सीरिजमध्ये 144.09च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. 150 पेक्षा जास्त बॉल खेळल्यानंतर एवढा स्ट्राईक रेट असणारा केदार हा तिसरा भारतीय बनला आहे. याआधी विरेंद्र सेहवागनं 150.25 च्या स्ट्राईक रेटनं 2008-09साली न्यूझिलंडविरुद्ध आणि रोहित शर्मानं 147.56च्या स्ट्राईक रेटनं 2014-15साली श्रीलंकेविरुद्ध हे रेकॉर्ड केलं होतं. केदार जाधवनं या सीरिजमध्ये सर्वाधिक 232 रन 77.33च्या सरासरीनं बनवल्या आहेत.
- कॅप्टन झाल्यानंतर कोहलीनं 17 वनडे इनिंगमध्ये एक हजार रनचा टप्पा गाठला. कॅप्टन झाल्यावर एवढ्या जलद हजार रन बनवण्याचा रेकॉर्ड कोहलीच्या नावावर झाला आहे. याआधी एबी डिव्हिलियर्सनं 18 इनिंगमध्ये आणि केन विलियमसननं 20 इनिंगमध्ये एक हजार रन केल्या होत्या. कॅप्टन झाल्यानंतरच्या 17 इनिंगमध्ये कोहलीनं 69ची सरासरी, 100.77चा स्ट्राईक रेटनं धावा केल्या आहेत. यामध्ये 5 सेंच्युरी आणि 5 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.
- कोलकत्यातल्या पराभवा आधी भारताला कोहलीच्या नेतृत्वात घरच्या मैदानात सलग 19 मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला नाही. यामध्ये भारतानं 10 टेस्टमध्ये विजय, दोन टेस्ट ड्रॉ आणि सात वनडेमध्ये विजय मिळवला होता.