नवी दिल्ली : प्रत्येक क्रिकेटरचे आपल्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न असते. भारत हा असा एक देश आहे जिथे क्रिकेटला धर्म मानले जाते. त्यामुळे क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
यातच खेळाबद्दलची आस्था आणि देशप्रेम यांना कोणी वेगवेगळं करु पाहत असेल तर त्याला कसे हाताळायचे याचे उत्तम उदाहरण क्रिकेटपटू इरफान पठाणने आपल्यासमोर ठेवलेय.
प्रदीर्घ काळापासून इरफान भारतीय संघात नाहीये. मात्र तो अद्याप क्रिकेट खेळतोय. सध्या तो बडोदा संघाकडून प्रतिनिधित्व करतोय. काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात इरफानने एक किस्सा सांगितला जो ऐकून इरफान एक क्रिकेटपटू होण्यासोबतच माणूस म्हणून किती चांगला आहे हे दिसून येते.
पाकिस्तानी दौऱ्यावर गेलेला असतानाचा प्रसंग इरफानने एका कार्यक्रमात सांगितला. त्यावेळी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेले असताना लाहोरमधील एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एका विद्यार्थ्यिनीने वेगळाच सवाल केला.
मुस्लिम असतानाही तुम्ही क्रिकेटमध्ये भारताकडून प्रतिनिधित्व का करता असा प्रश्न त्या विद्यार्थ्यीनीने विचारला. यावर इरफान म्हणाला, कारण भारतीय असल्याचा मला गर्व आहे. त्याच्या या उत्तराने मात्र ती विद्यार्थ्यीनी गप्पच झाली.