संदेश सावंत, www.24taas.com, रत्नागिरी
संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सध्या कासव संवर्धनाची मोहिम सुरु आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने दरवर्षी आयोजित होणा-या कासव महोत्सवासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे.
एक नाही.. दोन नाही.. तर एकामागून एक अशी अनेक कासवं रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर दिसत आहेत. अंड्यातून बाहेर पडणारी ही चिमुकली कासवं समुद्राक़डं झेपावताना दिसतात. कासवाची मादी समुद्रकिनारी अंडी घालते. मात्र ही अंडी चोरुन कासवांची तस्करी होत होती. त्याला लगाम घालण्यासाठी कासवमित्र भाऊ काटदरेंनी पुढाकार घेऊन कासवाची अंडी जमवण्यास सुरुवात केली. या अंड्यांची योग्य प्रकारे निगा राखत त्यांनी त्यांचं संवर्धन केलं. या संवर्धित केलेल्या अंड्यांमधून कासवाची पिल्लं बाहेर पडू लागली. या पिल्लांना पाहण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर गर्दी होऊ लागली आहे.
या कासवांनी फोटोग्राफर्सवरही मोहिनी घातली आहे. त्यांची छबी कॅमेऱ्यात कैद करण्यात फोटोग्राफरही दंग झालेत. कासव संवर्धनाचा हा छोटासा तरी कौतुकास्पद प्रयत्न आता कासव महोत्सवात रुपांतरीत होत आहेत. त्यामुळं ही मोहिम आणखी व्यापक करण्याची मागणी होत आहे. वाळूत जन्म झाल्यापासून ते समुद्राच्या पाण्यात झेपावणाऱ्या या कासवाच्या पिल्लाचा मनमोहक प्रवास सध्या पाहायला मिळत आहे