www.24taas.com, झी मीडिया, राजस्थान
राजस्थानमध्ये भाजपनं आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. जनतेनं अशोकपर्वाला निरोप देत महाराणीच्या हातात सत्ता दिलीय.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार भाजपनं सत्ता काबिज केली आहे. मात्र यावेळचं यश हे 2003 च्या यशापेक्षाही दैदिप्यमान असंच आहे. गेल्या वेळच्या तुलनेत भाजपनं जवळ जवळ दुप्पट जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला गेल्या वेळच्या तुलनेत निम्मे जागाही राखता आलेल्या नाहीत. राजस्थानच्या जनतेनं अशोक राज संपुष्टात आणून महाराणीच्या हातात सत्ता दिलीय.
दर पाच वर्षांनी सत्तेत बदल हा राजस्थानच्या जनतेचा स्वभाव राहिलेला आहे. या व्यतिरिक्त अशोक गेहलोत सरकारनं पहिल्या चार वर्षांतली निष्क्रीयता पुसण्यासाठी अखेरच्या महिन्यांमध्ये आरोग्याच्या क्षेत्रात अनेक अभिनव योजना सुरू केल्या मात्र त्या जनतेच्या पचनी पडल्या नाहीत. रिफायनरी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचा वादग्रस्त मुद्दाही काँग्रेसला भोवल्याचं दिसतंय. मीणा समाजाचे नेते किरोडीलाल मीणा यांनी भाजपविरोधात पुकारलेला यल्गारही काँग्रेसला फायद्याचा ठरलेला नाही.
तर गुज्जर समाजाचे नेते किरोडीसिंग भैसणा यांनी आरक्षणासाठी काँग्रेसला दिलेला पाठिंबाही काँग्रेसला तारु शकलेला नाही. याची जाणीव ठेवूनच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पराभव मान्य केल्याचं दिसतंय.
वसुंधरा राजे या चार वर्ष राज्यातून गाय़ब असल्याचा प्रचार काँग्रेसनं चालवला होता. मात्र जनतेनं त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. भाजपला प्रस्थापितविरोधी लाटेचा फायदा झाल्याचं स्पष्ट दिसतंय. शेतक-यांसाठी 24 तास मोफत वीज पुरवठा, 15 लाख बेरोजगारांना नोक-या आणि गुज्जरांना पाच टक्के आरक्षण हे घोषणापत्रातले मुद्दे जनतेच्या गळी उतरवण्यात भाजप यशस्वी ठरलेला दिसतो. मात्र राजस्थानच्या भावी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी विजयाचं श्रेय नरेंद्र मोदींना दिलंय.
भाजप आणि वसुंधरा राजेंसाठी सत्तेतून जाणं आणि सत्तेत येणं तसं नवीन नाही. मात्र त्यांनी यावेळी मिळवलेला विजय राजस्थानमधला भाजपचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. त्यामुळं पक्षातलं वसुंधरांचं वजन तर वाढणारच मात्र मोदींच्याही नेतृत्वाला यामुळं झळाळी येणार यात शंका नाही.
बिग फाइट
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे त्यांच्या पारंपरिक सरदारपुरा मतदारंसंघातून रिंगणात उतरले आहेत. त्यांनी भाजपच्या संभू खेतसरा यांचा १८,४७८ मतांनी पराभव केला
---------
माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्ष वसुंधरा राजे यांचे झालरापाटन मतदारसंघातून भवितव्य पणाला लागलं होतं. त्यांनी .काँग्रेसच्या मिनाक्षी चंद्रावत यांचा ६०,८९६ मतांनी पराभव केलाय.
.............
सवाई माधोपूर मतदारसंघातून मीणा समाजाचे नेते आणि खासदार किरोडीलाल मीणा यांना जयपूरच्या महाराणी आणि भाजपच्या उमेदवार दिया सिंह यांचे आव्हान होतं. महाराणी दिया सिंह यांनी किरोडीलाल यांना ७,५३२ मतांनी मात दिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.