www.24taas.com, नाशिक
आयटी सेक्टरमधल्या बीपीओ कंपन्या कर्मचाऱ्यांचं शोषण करतात. नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ काम, अत्यंत कमी पगार देऊन कामगार कायद्याची सर्रास पायमल्ली केली जाते. याविरोधात शेकडो कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद सुरु केला आहे.
कर्मचाऱ्यांना रोज १५ तास काम, गरोदर महिलांना नऊ महिने काम करणं सक्तीचं कर्मचाऱ्यांचं आर्थिक आणि शारीरिक शोषण यासारख्या घटनांमुळे कामगारही जेरीस आले आहेत. नाशिकच्या डब्ल्यूएनएस या कंपनीतला हा प्रकार डॉलर्सनं कमाई करणाऱ्या कंपन्या नाशिकच्या तरुणांची आर्थिक पिळवणूक करतात. याविरोधात कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारत 'झी २४ तास'कडे त्यांच्या व्यथा मांडल्या.
कंपनीनं कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढून टाकलं आहे. अनेक आंदोलक तरुणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात 'झी २४ तास'नं डब्ल्यूएनएस कंपनीशी संपर्क साधला पण प्रशासननानं बोलायला नकार दिला. आयटीच्या नावाखाली कामगार कायद्याचं सर्रास उल्लंघन केलं जातं. अनेक बीपीओ कर्मचाऱ्यांची आयुष्य त्यामुळे उध्वस्त होतात. वेळीच या प्रकरणी लक्ष घालून तोडगा काढणं गरजेचं आहे.