अमोल परांजपे, असोसिएट प्रोड्युसर, झी मीडिया
बळी तो कान पिळी...ही मराठीतली एक खूप जुनी म्हण आहे. याचा अर्थ ज्याच्याकडे ताकद आहे, तो इतरांचे कान पिळू शकतो. कोणत्याही क्षेत्रात हे १०० टक्के खरं असतं.
लोकशाहीत ज्याच्याकडे बहुमत असतं, तो बळी असतो. हुकूमशाहीत ज्याच्याकडे लष्करी ताकद असते, तो कोणाचेही कान कधीही पिळतो. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड पैसा आणि सामरिक ताकद असलेल्या अमेरिकेची दादागिरी चालते आणि ती सगळे जण निमुटपणे सहन करतात... मग क्रिकेटमध्ये बीसीसीआयनं दादागिरी केली, तर खरंच काही बिघडलं का?
आयसीसीच्या तांत्रिक समितीवर माजी कसोटीपटू शिमरामकृष्णन् यांच्या निवडीमुळे सध्या क्रिकेट विश्वात आंतरराष्ट्रीय वादंग माजलाय. अन्य देशांचं म्हणणं असं, की टीम मे ९ विरुद्ध १ मतानं निवडून आले असताना बीसीसीआयनं फेरमतदान घ्यायला लावलं आणि अनेक कर्णधारांना मे यांच्या विरोधात मत द्यायला भाग पाडलं. त्यामुळे शिवरामकृष्णन् यांची निवड ही अवैध आहे, असा त्यांचा आरोप आहे. आता फेरमतदान आणि बीसीसीआयचा दबाव हे जरी मान्य केलं, तरी त्यात बिघडलं काय? फेरमतदान घेण्यासाठी निश्चितच कायदेशीर मार्गाचा अवलंब झालाय. बीसीसीआयनं बंदूक दाखवून तर पुन्हा मतदान करायला भाग पाडलं असणं शक्य नाही आणि कॅप्टन्सवर दबाव टाकला, हे सिद्ध कसं करणार? त्यामुळे हे आरोप खरे असले, तरी बिनबुडाचे आहेत.
आयसीसी आणि बीसीसीआयचं नातं हे ‘जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा’ या प्रकारातलं आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष दालमिया आणि त्यानंतर शरद पवार यांनी भारतीय क्रिकेटला सोन्याचा मुलामा दिला. अवघे १० देश असलेल्या या खेळात असा कोटींमध्ये पैसा खेळेल, असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. पण भारतीयांच्या क्रिकेट वेडानं ते खरं करून दाखवलं. आता सुरू असलेली IPL ही याचं ढळढळीत उदाहरण. जगभरातले चांगले खेळाडू अन्यथा १० वर्षांत जमणार नाही, इतके पैसे एका वर्षात ‘छापतात’! अनेक खेळाडू तर आयपीएलसाठी आपल्या घरच्या क्रिकेट बोर्डांनादेखील जुमानत नाहीत. मग एखादा लसिथ मलिंगा चॅम्पियन्स लीगसाठी कसोटीतून निवृत्ती जाहीर करतो किंवा एखादा ख्रिस गेल वेस्टइंडिज संघातून खेळला नाही, तरी त्याला फरक पडत नाही... कारण आयपीएलनं त्यांचे दोन्ही प्रश्न सोडवले आहेत. पैसा आणि प्रसिद्धी.
असं असताना क्रिकेट विश्वात बीसीसीआयनं ‘दादागिरी’ केली, तर बिघडलं कुठे? ब्रिटिशांनी दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ भारतावर राज्य केलं. तेव्हा त्यांची दादागिरी आम्ही सहन केलीच ना! आताही जगाचं राजकारण आपल्याला हवं तसं वाकवणाऱ्या अमेरिकेची दादागिरी हेच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया निमुटपणे सहन करत आहेतच ना! तशीच क्रिकेटमध्ये आमची करा. कारण आम्ही तुमच्या क्रिकेटपटूंना पैसे मिळवून देतोय. त्यामुळे डीआरएस असो किंवा टेक्निकल कमिटीवर शिवरामकृष्णन् यांची निवड असो, आम्ही म्हणतो तसंच झालं पाहिजे, असं बीसीसीआय म्हणत असेल तर ते आयोग्य कसं म्हणता येईल?
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड या देशांनी क्रिकेटमध्ये पैसा आणावा आणि मग दादागिरी करावी, अन्यथा आम्ही म्हणू त्याला निमुटपणे मान्यता द्यावी. क्रिकेटच्या मैदानावर माहित नाही, पण बाहेर तरी आम्हीच दादा आहोत. त्यामुळे बीसीसीआयनं आपल्या मतानुसार आयसीसी आणि क्रिकेटविश्वाला वाकायला लावलं, तर त्यात कोणाच्या पोटात दुखायचं काही कारण नाही... शेवटी ‘बळी तो कान पिळी’ हेच खरं!
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.