भाजप नेत्याच्या लेटरहेडवरुन एकनाथ खडसेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार

जळगावचे आमदार सुरेश भोळे यांचे लेटरहेड वापरुन खडसेंविरोधात तक्रार करण्यात आली होती.

Updated: Jul 14, 2018, 06:32 PM IST
भाजप नेत्याच्या लेटरहेडवरुन एकनाथ खडसेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार title=

जळगाव:  भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षातून काहीसे बाजूला पडलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्याविरोधात भाजपच्याच एका आमदाराने तक्रार केल्याचा प्रकार समोर आला. मात्र, अधिक चौकशी केली असता कोणीतरी परस्पर या आमदाराच्या लेटरहेडवरुन तक्रार दाखल केल्याचे उघड झाले. 

जळगावचे आमदार सुरेश भोळे यांचे लेटरहेड वापरुन खडसेंविरोधात तक्रार करण्यात आली होती. खडसे यांचा मूळ व्यवसाय शेती असूनही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता आहे. याबाबत समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र हायकोर्टाचे न्यायाधीश व्ही. के. ताहिलरामानी यांच्याकडे पाठविण्यात आले होते. 

खडसेंच्या कन्या अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेतून कोट्यवधी रुपयांच्या नोटा बदलण्यात आल्या. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली असून ती दाबण्यात आली, असेही पत्रात म्हटले आहे. भोळे यांची हुबेहूब स्वाक्षरी या पत्रावर आहे. त्याच्यावर जावक क्रमांक मात्र नमूद करण्यात आलेला नाही. खडसे आमचे नेते असून आपल्याला बदनाम करण्याच्या हेतूने खोडसाडपणे कुणीतरी हे कृत्य केल्याचा दावा आमदार भोळे यांनी केला. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.

बनावट पात्रात खडसेंवर करण्यात आलेले आरोप:
१) खडसे खोट्या तक्रारी करून अंजली दमानियांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना वेठीस धरतात. 
२) राज्यात शेतकरी आत्महत्या करीत असताना खडसे याना शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून फार्म हाऊस, शाळा, साखर कारखाना, भोसरीत जमीन आदी मिळकती कशा घेता आल्या ? तरी त्यांना क्लीन चिट कशी मिळाली?
३) नोटाबंदी झाल्यानंतर खडसेंच्या कन्या अध्यक्ष असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतून कोट्यवधी रुपयांच्या नोटा बदलण्यात आल्या, या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली असून ती दाबण्यात आली. 
४) खडसेंना त्यांच्या पत्नीने किडनी दिली असं सांगण्यात आली. परंतु, न्यायालयीन चौकशी समिती नेमून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. व खडसेंच्या पत्नीची सोनोग्राफी करण्यात यावी.