Makar Sankranti 2024 : देशभरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा होतो. पंजाबमध्ये लोहरी, हरयाणामध्ये सक्रात, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तामिळनाडूमध्ये पोंगल तर महाराष्ट्रात मकर संक्रांत या नावाने तो ओळखला जातो. या दिवशी काळे वस्त्र आणि तिळगुळ खाण्याची परंपरा आहे. मकर संक्रांत हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो आणि हिवाळा ऋतूशी संबंधित आहे. तर हा सण साजरा करण्यामागे अजून एक हैतू म्हणजे सामाजात आणि लोकांमध्ये गोडवा निर्माण व्हावा म्हणून केला जातो. (Why is it called Sankranta Aali means Crisis has come So is Sankrant auspicious or inauspicious Makar Sankranti 2024)
आणि म्हणून म्हणतात, 'तीळगुळ घ्या गोड बोला' अशी म्हणण्याची प्रथा आहे. देशभरात हा सण सर्व ठिकाणी सकारात्मक आणि शुभ मानला गेला आहे. वाईटावर सत्याचा विजय, नवीन सुरुवात आणि कृषी संस्कृतीला समर्पित असा हा सण असतानाही संक्रांत आली म्हणजे संकट आलं असं का म्हटलं जातं. महाराष्ट्रात संक्रांत ही काही नकारात्मक समजुती म्हणून पाहिली जाते, असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. मकर संक्रांत सणाशी संबंधित म्हण प्रचलित असून ती म्हणजे 'संक्रांत येणं.' या म्हणीचा अर्थ आपल्यावर एखादं संकट येणं, असं म्हटलं जातं.
धर्मशास्त्रानुसार सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आल्याचं बोलं जातं. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकरासुराचा वेध केला होता. दरवर्षी देवीचं वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे वेगवेगळी असतात. असं म्हणतात की, देवी ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी तर ती जिकडे जाते आणि पाहते तिकडे संकट कोसळतं म्हणजेच संक्रात येणे म्हणजे संकट येतं असं म्हटलं जातं. त्यामुळे संक्रांतीला शुभ कार्य केले जात नाही. एवढंच नाही तर नवविवाहित जोडप्याचा पहिला सण म्हणून संक्रांत साजरी करत नाही.
पंचांगकर्ते आणि खगोल शास्त्र अभ्यासक संक्रांत अशुभ असल्याचं पूर्णपणे खोटं असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणतात, 'मकर संक्रांतीपासून दिवस मोठा, रात्र लहान होऊ लागते. दिवस मोठा होणं ही वाईट नसून चांगली आणि आनंदाची गोष्ट असून प्राचीन काळी विद्युत दिवे नसल्याने दिनमान मोठे होतं गेल्याने अधिक वेळ कामं करता येत होतं. म्हणून मकर संक्रांती हा गोड सण मानला जात गेला आहे.'
सोमण हे सांगतात की, 'संक्रांती देवीने पहिल्या दिवशी संकरासुर, दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाचा वेध केला, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. याचा अर्थ संक्रांती देवीने जर राक्षसाचा वेध केला तर संक्रांत वाईट कशी असेल? हा सत्याचा विजय असून ही तर चांगलीच गोष्ट असल्याने संक्रांत ही शुभ आहे.'
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)