मुंबई : भारताच्या वनडे टीममध्ये पुनरागमन करण्यासाठी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेला मोठा झटका लागला आहे. दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. मुंबई टीमच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी ही माहिती दिली आहे. अजिंक्य रहाणे भारतासाठी ५६ टेस्ट, ९० वनडे आणि २० टी-२० मॅच खेळला आहे.
क्रिकइन्फोनं दिलेल्या वृत्तानुसार अजित आगरकर म्हणाला 'रहाणे ग्रुप स्टेजमध्ये खेळला, पण आता त्याला रिकव्हर होण्यासाठी आरामाची गरज आहे. लीग स्टेजमध्ये अजिंक्य रहाणेला दुखापतीनं ग्रासलं होतं. पण आम्ही कठीण परिस्थितीमध्ये होतो, त्यामुळे रहाणेनं टीमसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. तो १०० टक्के फिट नाहीये.'
सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या ग्रुप-सीमध्ये मुंबईच्या टीमनं ६ पैकी ५ मॅच जिंकल्या आहेत. या ग्रुपमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ग्रुप स्टेजच्या सामन्यांमध्ये रहाणेनं ९.६६ च्या सरासरीनं फक्त ५८ रन केले आहेत. खराब फॉर्ममुळे रहाणेला टीममधून काढण्यासाठी तर दुखापतीचा बहाणा बनवण्यात आला नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे.
अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये राजस्थानच्या टीमकडून खेळतो. आता राजस्थानची टीमही रहाणेच्या फिटनेसवर लक्ष देऊन आहे. आयपीएलमध्ये राजस्थानचा पहिला सामना २५ मार्चला पंजाबविरुद्ध होणार आहे.
वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये आम्ही अजिंक्य रहाणेचाही विचार करतोय, असं भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले होते. पण आधी खराब फॉर्म आणि आता दुखापतीमुळे वर्ल्ड कपच्या टीममध्ये निवड होण्याची रहाणेची थोडीफार शक्यताही मावळली आहे.
'माझा विचार होत आहे, हे ऐकून चांगलं वाटलं. पण तुम्हाला संधीही दिली गेली पाहिजे. वर्ल्ड कप खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मी निवड समितीचा आदर करतो, पण मी संधीच्या लायक आहे. मी आशावादी आहे.' असं रहाणे म्हणाला होता.