मुंबई : चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आणखी एक रेकॉर्डची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा धोनी याने सुरेश रैनाला मागे टाकलं आहे.
दुबईमध्ये आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नईचा सामना होत आहे. महेंद्रसिंह धोनीचा हा आयपीएलमधील 194 वा सामना आहे. या सामन्याआधी धोनीने आयपीएलमध्ये एकूण 193 सामन्यांमध्ये 4476 धावा केल्या आहेत. सुरेश रैनाने आतापर्यंत एकूण 193 सामने खेळले असून त्याने 5368 धावा केल्या आहेत.
महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या सुरूवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्ज संघाशी जोडलेला आहे. जेव्हा चेन्नई सुपर किंग्जवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती, त्यावेळी धोनी राइजिंग पुणे सुपरजाईट्सकडून खेळला होता.
सुरेश रैनाही आयपीएलच्या सुरूवातीपासूनच चेन्नई संघात होता. 2016 आणि 2017 मध्ये तो गुजरात लायन्स संघात होता. चेन्नई सुपर किंग्जने तीन वेळा (2010, 2011 आणि 2018) आयपीएलचं विजेतेपद जिंकले आहे.
1. महेंद्रसिंग धोनी - 194
2. सुरेश रैना - 193
3. रोहित शर्मा - 192
4. दिनेश कार्तिक - 185
5. विराट कोहली - 180