मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात मंगळवारपासून (20 सप्टेंबर) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची असणार आहे. खेळाच्या बाबतीत हे दोन्ही संघ खुप ताकदवान आहेत, एकमेकांना मोठं आव्हान ठरू शकताता. दोन्ही संघात कोणीच वरचढ नाही.मात्र कमाईच्या बाबतीत कोणता संघ आघाडीवर आहे, हे तुम्हाला माहितीय का? नाही ना मग चला जाणून घेऊया.
टीम इंडियाच्या खेळाडूंना किती पगार मिळतो?
भारतीय खेळाडूंना (Team India) कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 सामना खेळण्यासाठी 3 लाख रुपये मिळतात. जर एखादा खेळाडू प्लेइंग 11 चा भाग नसेल तर त्याला या रकमेच्या 50 टक्के रक्कम मिळते.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंना किती पगार मिळतो?
ऑस्ट्रेलियन (Australia) खेळाडूला प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 18 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे 14.33 लाख रुपये) दिले जातात. तर एकदिवसीय सामन्यासाठी सुमारे 3.74 लाख रुपये (7 हजार AUS डॉलर) मिळतात. त्याचवेळी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया एका T20 सामन्यासाठी खेळाडूंना सुमारे 2.94 लाख रुपये (5.5 हजार AUS डॉलर) देते.
दरम्यान तिन्ही फॉरमॅटनुसार खेळाडूंच मानधन पाहिल्यास टीम इंडियाच्या खेळाडूंची फी ऑस्ट्रेलियन खेळाडूंपेक्षा जास्त आहे.
टीम इंडियाचा करार
बीसीसीआय (BCCI) दरवर्षी खेळाडूंची केंद्रीय करार यादी प्रसिद्ध करते. बोर्डाने खेळाडूंना A+, ग्रेड-A, ग्रेड-B आणि ग्रेड-C मध्ये विभागले आहे. A+ खेळाडूंना 7 कोटी, ग्रेड-A खेळाडूंना 5 कोटी, ग्रेड-B खेळाडूंना 3 कोटी आणि ग्रेड-C खेळाडूंना 1 कोटी रुपये वार्षिक मिळतात.खेळाडू कितीही सामने खेळले तरी ही रक्कम निश्चितच मिळते.
'या' खेळाडूंचा समावेश
ग्रेड-A+ मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे, ज्यांना वार्षिक सात कोटी रुपये मिळतात. तर रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, केएल राहुल आणि मोहम्मद शमी यांना ग्रेड-एमध्ये वार्षिक ५ कोटी रुपये मिळतात.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा करार
ऑस्ट्रेलियन (Australia) खेळाडूंच्या केंद्रीय कराराबद्दल बोलायचे झाले तर, कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला दरवर्षी सुमारे 10.70 कोटी रुपये (2 मिलियन AUS डॉलर) मिळतात. यानंतर जोश हेजलवूडचा नंबर लागतो. त्याला वर्षाला सुमारे 8.56 कोटी रुपये मिळतात.डेव्हिड वॉर्नरला 8.2 कोटी तर मिचेल स्टार्कला 7.49 कोटी मानधन दिले जाते.
दरम्यान आकडेवारी पाहता पॅट कमिन्स, हेझलवूड, वॉर्नर आणि स्टार्क या खेळाडूंचे वार्षिक वेतन विराट कोहली आणि रोहित शर्माच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन या खेळाडूंना केएल राहुल, जडेजा यांच्यापेक्षा जास्त पगार मिळतो आहे.