IPL 2022 : आयपीएल फ्रेंचाइजी दिल्ली कॅपिटल्स (DC) बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श हा रॅपिड अँटीजेन चाचणीत कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा स्थितीत आता दिल्ली कॅपिटल्सच्या पुढील सामन्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
दिल्ली-पंजाब सामन्याचा उद्या निर्णय
पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना होणार की नाही याबाबत बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य उद्या (मंगळवारी) निर्णय घेणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स (DC) ला त्यांचा पुढील सामना पंजाब किंग्ज विरुद्ध 20 एप्रिल रोजी खेळायचा आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'मिशेल मार्शची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे आणि ती सर्वात विश्वासार्ह चाचणी आहे. मिचेल मार्श दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांच्या संपर्कात होता. त्यामुळेच त्याच्यामध्ये काही लक्षणे आढळून आली. ही प्रकरणे समोर आल्यानंतर दिल्लीची संपूर्ण टीम क्वारंटाईनमध्ये गेली.
कोरोना महामारीमुळे आयपीएल 2021 वर मोठा परिणाम झाला. 4 मे 2021 रोजी, आयपीएलचा तो हंगाम मध्येच पुढे ढकलावा लागला. सनरायझर्स हैदराबाद (SRH) यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
त्यादरम्यान, लीग पुढे ढकलले जाईपर्यंत एकूण 29 लीग सामने झाले होते. नंतर BCCI ने उर्वरित सामने UAE मध्ये यशस्वीरित्या आयोजित केले.