IPL 2024: आयपीएल स्पर्धा आता जवळपास अर्ध्यावर आली असून, संघांचं भवितव्य थोडंफार स्पष्ट झालं आहे. आयपीएल स्पर्धा सुरु झाली तेव्हा हार्दिक पांड्याची सर्वाधिक चर्चा होती. रोहित शर्माला हटवून त्याला कर्णधार केल्यानंतर हार्दिक पांड्याला मुंबईच्या चाहत्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. हार्दिक पांड्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईच्या ताफ्यात परतल्यानंतर लगेच त्याला कर्णधार करण्यात आलं होतं. पण गुजरातचं नेतृत्व करताना दाखवलेली चमक तो मुंबई संघात दाखवू शकलेला नाही. यामुळे त्याला मैदान आणि मैदानाबाहेर चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. वानखेडे मैदानात सामना सुरु असताना त्याच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. या सर्व घडामोडींवर हार्दिक पांड्या जाहीरपणे व्यक्त झालेला नसला तरी तो प्रचंड दबावात आहे.
हार्दिक पांड्या संघासह वैयक्तिक कामगिरीतही चमक दाखवू शकलेला नाही. त्याने 7 सामन्यांमध्ये 4 विकेट्स घेतले असून 146.87 च्या सरासरीने 141 धावा केल्या आहेत. यामुळे त्याच्यावर होणारी टीका कमी होण्याऐवजी वाढतच आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी फंलदाज रॉबिन उथप्पा याने 'द रणवीर शो'मध्ये यासंदर्भात काही खुलासे केले आहेत.
"हार्दिक पांड्यामध्ये महान खेळाडू होण्याची क्षमता आणि कौशल्य आहे. ज्या संघाने त्याचा शोध लावला त्याच संघाने त्याला दुसऱ्या संघात जाऊ दिलं. त्या संघासह 3 ते 4 वेळा स्पर्धा जिंकल्याने त्यानेही संघ सोडला. त्याला कदाचित थोडं वाईट वाटलं असावं. तो गुजरात टायटन्स संघात गेला. तिथे त्याने पहिल्या हंगामात स्पर्धा जिंकून दिली आणि नंतर अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. यानंतर चर्चा सुरु झाली," असं रॉबिन उथप्पाने सांगितलं.
"त्याला आपल्यावर होणारी टीका, ट्रोलिंग, मीम्स या सर्व गोष्टींची कल्पना आहे. तो दुखावला जात नसेल असं तुम्हाला वाटतं का? कोणताही व्यक्ती यामुळे दुखावतो. किती लोकांना यामागील सत्यता माहिती आहे? हार्दिक सध्या नक्कीच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करत असावा. व्यक्ती, भारतीय म्हणून आपण फार भावनिक असल्याचं समजू शकतो. पण कोणत्याही व्यक्तीला अशी वागणूक देणं योग्य नाही. एखाद्याशी असं करणं आणि ते बरोबर आहे असं समजणं समाज म्हणून अशोभनीय आहे. त्यावर आपण हसू नये, फॉरवर्ड करू नये," असं रॉबिन उथप्पाने सुनावलं आहे.
रॉबिन उथप्पाने यावेळी भारतीय संघाचा वर्ल्डकपमध्ये पराभव झाल्यानंतरही कशाप्रकारे त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला याची जाणीव करुन दिली. हार्दिक पांड्यालाही अशी वागणूक द्यायला हवी असा सल्ला त्याने दिला आहे.
"हे आपलं कर्तव्य आहे. यामुळेच आपल्याला दोन वेळचं अन्न मिळत आहे. माझं काम टीका करणं आहे. कॉर्पोरेटमध्ये काम करणारी व्यक्ती टीव्हीवर येऊन टीका किंवा त्याबद्दल मतही व्यक्त करणार नाही. असं असताना, तुम्ही इतर व्यक्ती अपयशी होत असल्यास काही प्रमाणात सहानुभूती आणि सन्मान दाखवावा लागेल. एक देश म्हणून आम्ही केलेल्या सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक म्हणजे आमची प्रेमाची अभिव्यक्ती आणि आम्ही विश्वचषक गमावल्यानंतर भारतीय संघाबद्दलची आमची प्रतिक्रिया. एक समाज म्हणून आणि भारतीय म्हणून आपण असेच असले पाहिजे,” उथप्पा म्हणाला.