IPL 2024 : आयपीएलच्या पंचवीसव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangluru) धुव्वा उडवला. पहिली फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुने मुंबईसमोर 197 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान मुंबईने अवघ्या सोळाव्या षटकात पूर्ण केलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा हा सहा सामन्यातला तब्बल पाचवा पराभव ठरलाय. आयपीएलच्या यंदाच्या हंमामात बंगळुरुने केवळ पंजाबविरुद्ध विजय मिळवला आहे. आयपीएल पॉईंटटेबलमध्ये (IPL PointTable) बंगळुरु नवव्या स्थानावर आहे आणि आता प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका त्यांच्यासमोर आहे.
आरसीबीचा खलनायक
आरसीबीसाठी सर्वात मोठा खलनायक ठऱतोय तो म्हणजे साडेसोळा कोटी रुपयांचा ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेल. ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) खराब कामगिरीचा फटका बंगळुरुला सहन करावा लागतोय. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजवणारा ग्लेन मॅक्सवेल आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सपशेल फ्लॉप ठरलाय. ग्लेन मॅक्सवेलने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात केवळ 32 धावा केल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलची 6 सामन्यात धावसंख्या आहे 0, 3, 28, 0, 1 आणि 0.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात बंगळुरुला ग्लेन मॅक्सवेलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो भोपळाही फोडू शकला नाही. मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेलच्या अपयशामुळे बंगळुरुच्या फलंदाजीवर दबाव पडतोय. मॅक्सवेल ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 106 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात त्याने 155.51 की स्ट्राइक रेटने 2468 धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये मॅक्सवेल फ्लॉप
ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ग्लेन मॅक्सवेलने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तब्बल 5 शतकं लगावली आहेत. ग्लेन मॅक्सवेलची टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्द आणि आयपीएल कारकिर्दीची तुलना केली तर मॅक्सवेलने टी20 क्रिकेटमध्ये 30.09 च्या अॅव्हरेजने धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये यात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. आयपीएलमध्ये मॅक्सवेलने अवघ्या 25.24 च्या अॅव्हरेजने धाव्या केल्यात.
मॅक्सवेलची आयपीएल कारकिर्द
मॅक्सवेल आयपीएलमध्ये आतापर्यंत 130 सामने खेळलाय.यात त्याने 2751 धावा केल्या आहेत. 95 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या असून 18 वेळा त्याने अर्धशतकी खेळी केली आहे.
आरसीबीची आयपीएलमधली कामगिरी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये एकदाही जेतेपद मिळवलेलं नाही. 2008 ते 2024 च्या आयपीएल हंगामात बंगळुरुने तीनवेळा फायनलमध्ये प्रवेश केला, पण तीनही वेळा आरसीबीला उपविजेतापदावर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे आयपीएलमधला सर्वाधिक 263 स्कोर आणि सर्वात निचांक 49 स्कोर आरबीसीच्या नावावरच होता. आता सनरायजर्स हैदराबादने सर्वाधिक धावसंख्येचा बंगळुरुचा विक्रम मागे टाकला आहे.