भारतीय क्रिकेटर्स नुसते पैसा आणि अहंकार...; कपिल देव यांनी झापलं

Kapil Dev on Indian Cricketers: 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. जास्त पैसा आल्याने काही खेळाडू फार गर्विष्ठ झाले असल्याचं कपिल देव म्हणाले आहेत. त्यांना इतरांचा सल्ला घेणं योग्य वाटत नाही अशी टीका त्यांनी केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 30, 2023, 03:44 PM IST
भारतीय क्रिकेटर्स नुसते पैसा आणि अहंकार...; कपिल देव यांनी झापलं title=

Kapil Dev on Indian Cricketers: 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय संघातील खेळाडूंसंबंधी मोठं विधान केलं आहे. कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी खेळाडूंना आपण सर्वज्ञानी असल्याचं वाटतं. त्यांना इतरांचा सल्ला घेणं योग्य वाटत नाही अशी टीकाही केली.

कपिल देव यांनी 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, "मतभेद सर्वांमध्ये असतात, मात्र या खेळाडूंमध्ये एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. पण नकारात्मक बाब म्हणजे त्यांना सर्व काही माहिती आहे".

IND vs WI: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर हतबल विराट कोहली संतापला, VIDEO व्हायरल

ते म्हणाले की "या गोष्टी नेमक्या कशा पद्दतीने सुधारता येतील हे मी सांगू शकत नाही. पण त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. त्यांना असं वाटतं की, आपल्याला कोणालाही कोणतीच गोष्ट विचारण्याची गरज नाही. पण मला नेहमी वाटतं की, एक अनुभवी व्यक्ती नेहमी तुम्हाला मदत करु शकतो".

कपिल देव यांनी यावेळी पैशासह अहंकारही येतो असं सांगितलं. काही खेळाडू असे आहेत, ज्यांचा गर्व त्यांना सुनील गावसकरांसारख्या दिग्गज खेळाडूचा सल्ला घेण्यापासून रोखतो अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले "अनेकदा असं होतं की, जास्त पैसे आल्यास सोबत अहंकारही येतो. या क्रिकेटर्सना आपल्याला सर्व काही येतं असं वाटतं. यामध्ये फार अंतर आहे".

 "हे असे क्रिकेटर्स आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. तिथे सुनील गावसकर असताना तुम्ही त्यांच्याशी बोलत का नाही? अहंकार कशाला? असा अहंकार कुठेच नाही. त्यांना आपण फार चांगले खेळाडू आहोत असं वाटतं. ते कदाचित चांगले असतीलही, पण 50 सीझन क्रिकेट पाहणाऱ्या व्यक्तीचीही मदत घेतली पाहिजे. कधीकधी एखाद्यायाल ऐकल्यानंतरही आपले विचार बदलू शकतात," असं कपिल देव यांनी सांगितलं.

वेस्ट इंडिजविरोधातील दुसऱ्या सामन्यात पराभव

वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला. शनिवारी ब्रिजटाउनमधील केंसिंग्टन ओव्हल मैदानात खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाने फक्त 181 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजने 35 ओव्हर्समध्येच हा सामना जिंकला. आता दोन्ही संघ 1 ऑगस्टला त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडिअममध्ये तिसरा एकदिवसीय सामना खेळणार आहेत. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू विराट शर्मा यांना विश्रांती देण्यात आली होती. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं.