मुंबई : 2004 साली जेव्हा महेंद्रसिंह धोनीने (Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला, तेव्हा मोहम्मद कैफ टीम इंडियामध्ये कारकिर्दीच्या शिखरावर होता, परंतु मोहम्मद कैफने एक-दोन वर्षांत टीम इंडियामधले आपले स्थान गमावले. त्यानंतर तो पुन्हा कधीही संघात परत येऊ शकला नाही.
स्पोर्टस्क्रिनशी बोलताना मोहम्मद कैफने एक घटना सांगितली. जेव्हा त्याने संपूर्ण भारतीय टीमला घरी डिनरसाठी आमंत्रित केले होते. कैफने सांगितले की, 2006 मध्ये नोएडामध्ये मी सर्व भारतीय क्रिकेटर्सना माझ्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले होते, परंतु मी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीसारख्या मोठ्या क्रिकेटपटूंमध्ये व्यस्त होतो, त्यामुळे मला महेंद्रसिंहसारख्या तरूण खेळाडूशी योग्यरित्या बोलता आले नाही.
मोहम्मद कैफ म्हणाला की, 'सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीसारख्या बड्या क्रिकेटपटूंना मी जेवणासाठी आमंत्रित केले होते तेव्हा मी खूप चिंताग्रस्त होतो. सोबत तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपेल देखील उपस्थित होते. मी विचार करत होतो की, मी त्यांना कसं अटेंड करु. माझे सर्व लक्ष तेंडुलकर आणि गांगुली सारख्या बड्या क्रिकेटपटूंच्या होस्टिंगवर होते.
कैफने सांगितले की, एमएस धोनी आणि सुरेश रैना यांच्यासह इतर तरुण खेळाडू स्वतंत्र खोल्यांमध्ये बसले होते, परंतु मी वरिष्ठ खेळाडूंमध्ये व्यस्त होतो. युवा खेळाडूंकडे मी लक्ष देऊ शकलो नाही, जे धोनीला कदाचित आवडले नव्हते. कैफ हसला आणि म्हणाला, 'जेव्हा 2007 मध्ये धोनी कर्णधार झाला त्यानंतर मग मी संघात पुनरागमन करू शकलो नाही. तो नेहमी मला ही गोष्ट आठवण करुन देतो की, तो जेव्हा घरी आला तेव्हा मी त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं.'
कैफने विनोदात म्हटले होते की, 'धोनी कर्णधार होण्यापूर्वी कदाचित त्याला योग्य प्रकारे बिर्याणी सर्व्ह केली नाही. कैफने सांगितले की, त्यानंतर धोनीने त्याला विनोदात म्हटले होते की, जेव्हा तू घरी येईल तेव्हा मी तुझी काळजी घेणार नाही.'