मुंबई : आयपीएल २०१८च्या कार्यक्रमात पुन्हा एकदा बदल करण्यात आलेत. हा बदल प्ले ऑफच्या सामन्यांसाठी करण्यात आलाय. पुण्यात होणारे इंडियन प्रीमियर लीगचे दोन प्ले ऑफचे सामने आता कोलकाताच्या इडन गार्डन्सवर होणार आहेत. शुक्रवारी याबाबतची माहिती देण्यात आली. हा बदल आधीपासूनच ठरवण्यात आला होता. मात्र सामन्यांचे नेमके स्थळ ठरलेले नव्हते. राजीव शुक्ला म्हणाले, आयपीएलचे एलिमिनेटर आणि क्वालिफायरचे सामने अनुक्रमे २३ आणि २५ मेला कोलकातामध्ये होणार आहेत.
नियोजित कार्यक्रमानुसार हे सामने पुण्यात होणार होते. पुणे हे चेन्नईचे सध्याचे घरचे मैदान आहे. बंगाल क्रिकेट संघाचे संयुक्त सचिव अविषेक दालमिया यांनी सांगितले, आम्हाला प्लेऑफचे सामने आयोजित करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला. आम्ही याचीच वाट बघत होतो. क्वालिफायरचा एक सामना २२ मेला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार तर २७ मेला फायनलही येथेच खेळवण्यात येणार आहे.
प्ले ऑफसाठी अद्याप एकही संघ ठरलेला नाहीये. सध्याची स्थिती पाहता चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता हे संघ प्ले ऑफमध्ये जागा मिळवू शकतात. तसेच बऱ्याच कालावधीनंतर पंजाबचा संघ चांगली कामगिरी करतोय त्यामुळे तेही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.