मुंबई : वर्ल्ड कप-2019 च्या वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलमध्ये पराभवानंतर रवी शास्त्री यांची पुन्हा निवड होणार नाही अशी चर्चा होती. पण रवी शास्त्री यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. 57 वर्षांचे रवी शास्त्री पुन्हा एकदा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले गेले आहेत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 6 नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. रवी शास्त्री यांच्यासह माजी क्रिकेटर लालचंद राजपूत आणि रॉबिन सिंह यांचं देखील नाव यादीमध्ये होतं.
कोण होते स्पर्धेत
- रवी शास्त्री (वय 57 वर्षे; 80 टेस्ट, 150 वनडे )
- टॉम मुडी (वय 53; 8 टेस्ट, 76 वनडे )
- माइक हेसन (वय 44; खेळाडू म्हणून अनुभव नाही)
- फिल सिमंस (वय 56; 26 टेस्ट, 143 वनडे)
- लालचंद राजपूत (वय 57; 2 टेस्ट, 4 वनडे )
- रॉबिन सिंह (वय 55; 1 टेस्ट, 136 वनडे)
जुलै 2017 मध्ये रवी शास्त्री दुसऱ्यांदा कोच बनले होते. त्यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने 21 टेस्ट सामने खेळले ज्यामध्ये 13 सामने भारताने जिंकले. 36 पैकी 25 टी-20 आणि 60 पैकी 43 वनडे सामने भारताने जिंकले आहेत. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारताने एकूण 81 सामने जिंकले.
क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये जुलै 2017 नंतर भारताच्या विजयाचं प्रमाण पाहिलं तर, टेस्टमध्ये 52.38 टक्के, टी-20 मध्ये 69.44 टक्के आणि वनडेमध्ये 71.67 टक्के राहिलं आहे. रवी शास्त्री यांच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 2015 नंतर 2019 मध्ये ही भारत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पराभूत झाला.