पोर्ट ऑफ स्पेन : वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडेत दमदार विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या वनडेत भारताचा कर्णधार विराट कोहली संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. तिसऱ्या वनडेत विराट ऋषभ पंतला संधी देऊ शकतो.
येत्या ३० जूनला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरी वनडे रंगतेय. दुसऱ्या वनडेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ऋषभ पंतच्या सहभागाबद्दल विराटला विचारले असता तो म्हणाला, आम्ही यावर चर्चा करु आणि निर्णय घेऊ. अँटिग्वा येथे होणाऱ्या सामन्यात इतर क्रिकेटर्सना संधी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुसऱ्या वनडेत फलंदाजांनी केलेल्या कामगिरीबाबत विराटने समाधान व्यक्त केले. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी चांगली सलामी दिली. रहाणेने १०३ धावा तडकावल्या तर धवनने ६३ धावांची खेळी केली. विराटनेही ६६ चेंडूत ८७ धावा चोपल्या. यामुळे भारताला ४३ षटकांत ३१० धावा करता आल्या.
यासोबत तिसऱ्या सामन्यातील युवराजच्या सहभागाची शक्यता कमी दिसतेय. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यातही त्याला केवळ १४ धावा करता आल्या. त्याचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय बनलाय. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विराट युवराजला संघाबाहेर ठेवणार की आणखी एक संधी देणार हे पाहावे लागेल.