मुंबई : टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा कहर पहायला मिळाला, तर फलंदाजीत कर्णधार रोहित शर्माने मैफील लूटली. मात्र, यादरम्यान रोहित शर्माचा एक शॉट चिमुरडीसाठी मोठा धोका ठरला, जे पाहून सगळेच अवाक् झाले आणि सामना काही काळ थांबवावा लागला.
रोहित शर्माने भारतीय डावाच्या पाचव्या ओव्हरमध्ये जबरदस्त षटकार ठोकला. मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेली एक मुलगी यावेळी जखमी झाली. रोहितच्या बॅटमधून मारलेला हा धारदार शॉट थेट स्टँडमध्ये बसलेल्या मुलीला जावून लागला.
#RohitSharma SIX hits girl in the stand pic.twitter.com/mSm17wyHFK
— Soni Gupta (@SoniGup46462554) July 12, 2022
या घटनेनंतर इंग्लंडच्या फिजिओ स्टाफने मुलीवर उपचार करण्यासाठी धाव घेतली, तर सामना काही काळ थांबवण्यात आला. ती मुलगी पूर्णपणे बरी असल्याची आशा व्यक्त केली जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर चाहतेही इंग्लंडच्या फिजिओ स्टाफचे कौतुक करत आहेत.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार खेळी खेळली. या सामन्यात त्याने 58 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 76 धावांची खेळी केली. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने भारतासमोर केवळ 111 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे टीम इंडियाने एकही विकेट न गमावता पूर्ण केले.