मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीये. कसोटी संघात उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील 28 वर्षीय सौरभ कुमारला संधी मिळाली आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज असलेल्या सौरभला इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावात कोणीच विकत घेतलं नाही. पण आता त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे.
तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळतो आणि 2014 मध्ये त्याने पदार्पण केले होते. गेल्या वर्षी भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान त्याची नेट गोलंदाज म्हणून निवड झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस वरिष्ठ संघाच्या आधी भारत अ संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. सौरभही या संघाचा एक भाग होता.
सौरभने 2014 साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2015-16 मध्ये गुजरात विरुद्ध उत्तर प्रदेशच्या पहिल्या सामन्यात त्याने 10 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. बॅटनेही तो उत्तम कामगिरी करतो. त्याने 29.11 च्या सरासरीने दोन प्रथम श्रेणी शतके आणि आठ अर्धशतके झळकावली आहेत. 2019-20 च्या शेवटच्या रणजी हंगामात सौरभने 21.09 च्या सरासरीने 44 विकेट घेतल्या होत्या.
हे पण वाचा : Team India कडे ओपनिंगसाठी आता हे ५ पर्याय, तुमची पसंती कुणाला?
2018-19 मध्ये सौरभने दुलीप ट्रॉफीमध्ये 19 विकेटसह 51 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीमुळेच गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत अ संघात त्याची निवड झाली होती. सौरभ आयपीएलमध्ये पंजाब किंग्स (PBKS) आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स (RPS) चा भाग राहिला आहे, परंतु त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. भारत अ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये सौरभने चार बळी घेतले. 2/52 हा त्याचा सर्वोत्तम खेळ होता. 46 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 24.15 च्या सरासरीने 196 विकेट्स घेतल्या आहेत. या कालावधीत त्याने 16 वेळा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.
संबधित बातमी : IND vs WI : धोनी आणि कोहलीला मागे टाकत रोहितने बनवला हा रेकॉर्ड