Chhaava movie trailer : स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर बेतलेल्या अनेक कलाकृती आजवर साकारण्यात आल्या. छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणंच कमालीच्या ताकदीनं कलाकारांनी हा प्रयत्न करत प्रेक्षकांपुढं त्यांचं प्रभावी रुप आणि कर्तृत्त्वं सादर केलं. यातच आता भर पडली आहे ती आणखी एका कलाकृतीची, ती म्हणजे विकी कौशलची (Vicky Kahushal) मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'छावा' (Chhaava movie) चित्रपटाची.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आणि पुन्हा एकदा मराठा साम्राज्य, मुघलांची आक्रमणं आणि हे हल्ले परतवून लावणारा शिवबांचा शूरवीर छावा असंच चित्र सर्वांच्या डोळ्यांपुढं उभं राहिलं. विकी कौशल यानं छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी घेतलेली मेहनत अवघ्या काही मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
जय भवानीचा जयघोष असो किंवा 'हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा' असं म्हणत अंगात जणू खुद्द छत्रपतीच संचारले आहेत अशा अविर्भावात काही क्षण ही व्यक्तिरेखा जगणारा विकी कौशल असो. ट्रेलरमधील काही दृश्य खडबडून जागं करतात. अभिनेत्री रश्मिका मंधानानंही साकारलेली येसुबाईंची व्यक्तिरेखा इथं लक्ष वेधत आहे.
'छावा'च्या ट्रेलरमुळं जिकतं कौतुक विकी कौशलचं आणि त्याच्या अभिनयाचं होत आहे तितकंच कौतुक अभिनेता अक्षय खन्नाचंही होत आहे. त्यानं साकारलेला औरंगजेब पाहताना खरंच मुघल सम्राट औरंगजेब किती क्रूर शासक होता याचीच झलक पाहायला मिळत आहे. थोडक्यात जितकी ताकदीची मध्यवर्ती भूमिका आहे, तितक्याच ताकदीचा खलनायक या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
ए.आर.रहमानच्या पार्श्वसंगीताची जोड मिळालेल्या या चित्रपटाची निर्मिती दिशेन विजन यांनी केली असून, ऋषी वीरमणी यांनी लिहिलेल्या संवादांची आता प्रेक्षकांना कितपत भुरळ पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, या बहुप्रतिक्षित कलाकृतीला किती प्रेक्षकपसंती मिळते आणि विकीसह संपूर्ण चित्रपटाच्या टीमला किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.