तुमचे विचार आणि ध्येय मोठे असतील तर तुम्हाला सर्व काही शक्य आहे, हे 22 वर्षीय सिद्धेश नारकरने त्याच्या उदाहरणातून दाखवून दिलं आहे. सातासमुद्रापार जर्मनीत सिद्धेश नारकरची कॅलेस्थेनिक्स इंडियोरन्स स्पर्धेत निवड झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या खेळातील मातब्बर व्यक्तींसोबत यंदा खेळणारा सिद्धेश हा सर्वात तरुण मुलगा आहे. ही कॅलेस्थेनिक्स इंडियोरन्स स्पर्धा जर्मनीत होणार आहे.
22 वर्षीय सिद्धेश नारकर हा जोगेश्वरीतील इंदिरा नगर परिसरात राहणारा मुलगा आहे. वडिलांच प्रमोद नारकर हे बिल्डिंगच्या जिन्या खाली इस्त्रीच छोटंस दुकान चालवतात तर आई प्रियंका नारकर बालवाडीत कामाला आहे. मोठी बहिण प्राजक्ता नारकर ही एका कंपनीत अकाऊंट्समध्ये काम करते. अतिशय सामान्य कुटुंबातील मुलगा एवढी मोठी भरारी घेत असल्याचा नारकर कुटुंबाला आणि जोगेश्वरीकरांना अभिमान आहे.
सिद्धेशला व्यायाम आणि योग अभ्यास आवडायचा. घर लहान असल्यामुळे जोगेश्वरीतील करकरे गार्डनमध्ये सराव करत असे. या दरम्यान त्याने काही मुलांना कॅलेस्थेनिक्स खेळाचा सराव करताना पाहिलं. कोणतीही उपकरणे नाहीत कोणताही खर्च नाही तरीही हा खेळला जात असल्याची माहिती त्याला मिळाली आणि उत्सुकता वाढल्याचं सिद्धेश नारकर सांगतो.
कॅलिस्थेनिक्स किंवा कॉलिस्टेनिक्स हा एक स्ट्रेंथ प्रशिक्षणाचे एक प्रकार आहे. जे एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे वजन कोणत्याही उपकरणासह योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते. हा खेळाचा प्रकार अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खेळू शकतो. यामध्ये कोणताही खर्च नाही. तुमचं शरीरचं तुमच्यासाठी महत्त्वाचे असते.
सिद्धेश नारकर सांगतो की, मी सद्गुरु श्री वामनराव पै यांनी निर्माण केलेली 'जीवनविद्या'फॉलो करतो. यामध्ये सद्गुरुंनी 'शरीर साक्षात् परमेश्वर' असल्याचं सांगितलं आहे. यामुळे मला शरीराचं महत्त्व माहित होतं. त्याचप्रमाणे आपण असं काही तरी करावं ज्यामुळे आपल्या देशाचं नाव अभिमानाने घेतले जाईल, असे मला कायम वाटायचे, असं सिद्धेश नारकर सांगतो. कॅलेस्थेनिक्स या खेळात या दोन्ही गोष्टी साध्य होत होत्या. तसेच या खेळाकडे माझी सर्वाधिक ओढ असल्याचं मला जाणवलं. या खेळासाठी शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य आणि संतुलनाची खूप गरज असते. अशावेळी मला विश्वप्रार्थना, शरीर साधनेची प्रचंड मदत झाल्याचंही सिद्धेश सांगतो.
गेल्या तीन वर्षांपासून सिद्धेश कॅलेस्थेनिक्स हा खेळ खेळत आहे. पुण्यात पहिल्यांदा या खेळात सहभाग घेतला तेव्हा त्याची ओळख कोच शुभम मिश्रा यांच्याशी झाली. सिद्धेशला या स्पर्धेत मी पाहिलं. त्याचा खेळ चांगला होता पण त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याचं जाणवलं. गेल्या अडीच वर्षांपासून मी सिद्धेशला ट्रेन करतोय. एवढ्या कमी वयात उत्तम कॅलेस्थेनिक्स खेळणारा हा खेळाडू असल्याचं हेड कोच आणि इंडियन स्कूल ऑफ कॅलेस्थेनिक्सचे फाऊंडर शुभम मिश्रा सांगतात.
सिद्धेश नारकरची जर्मनीत होत असलेल्या कॅलेस्थेनिक्स इंडियोरन्स स्पर्धेत निवड झाली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत सर्वात तरुण खेळाडू म्हणून सिद्धेश नारकरची नोंद झालीय. महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणारा हा एकमेव खेळाडू आहे. या खेळाचा खर्च नसला तरीही खेळासाठी आवश्यक तो आहार घेण्यासाठी योग्य तो डाएट फॉलो करणं आवश्यक आहे. तसेच या खेळासाठी जर्मनीतील सगळा प्रवास आणि तेथील खर्च हा खेळाडूला करावा लागणार आहे. सिद्धेश नारकरला यासाठी 2 लाखाहून अधिक खर्च येणार आहे.