दुबई : आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेट राखून दणदणीत पराभव केला. पण या मॅचच्या लाईव्ह कॉमेंट्रीवेळी सुनील गावसकर यांचा पारा चांगलाच चढला. दिनेश कार्तिक आणि फकर जमान यांच्यावर सुनील गावसकर भडकले. या दोन्ही खेळाडूंनी टी-शर्ट आणि टोपी वापरण्यात असंवेदनशीलता दाखवल्यामुळे गावसकर नाराज झाले.
फकर जमाननं त्याच्या डोक्यावर असलेल्या टोपीला रॅपर गुंडाळून बॉलिंग केली. पाकिस्तानच्या टीममध्ये कोणीतरी किंवा त्यांच्या कर्णधारानं फकर जमानला समजवायला हवं. ही राष्ट्रीय कॅप आहे आणि त्याचा आदर केला पाहिजे. तुम्ही पाकिस्तान सुपर लीगमध्ये हे करू शकता पण राष्ट्रीय टीममध्ये नाही. यानंतर फकर जमाननं त्याची टोपी अंपायरकडे दिली.
यानंतर सुनील गावसकर यांनी दिनेश कार्तिकवरही निशाणा साधला. दिनेश कार्तिकनं टी-शर्टवर डीके लिहिलं होतं. डीके त्याचं टोपण नाव असेल पण टी-शर्टवर त्याचा नंबर लिहिला आहे. त्यामुळे लोकांना माहिती आहे या नंबरचा टी-शर्ट कोण घालतं. मग त्यानं टी-शर्टवर डीके का लिहीलं आहे? टी-शर्टवर त्यानं दिनेश कार्तिक असं पूर्ण नाव लिहीलं पाहिजे.
गावसकर यांनी याआधीही खेळाडूंच्या हेअरस्टाईल आणि टॅटूवर निशाणा साधला होता. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० टीममध्ये अजिंक्य रहाणेऐवजी लोकेश राहुलला संधी देण्यात आली होती. तेव्हा गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. सगळ्या चांगल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे, असंच वाटतंय. या खेळाडूंना टीममध्ये पुनरागमन करायचं असेल तर नवीन हेअरस्टाईल बनवावी लागेल आणि शरिरावर टॅटू काढावा लागेल. तर त्यांची निवड होण्याची शक्यता आहे, असा टोमणा गावसकर यांनी लगावला होता.