मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला आहे. आता टी 20 सीरिजमध्ये व्हाईट वॉश देण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू सज्ज झाले आहेत. शुक्रवारपासून टी 20 सीरिज सुरू होत आहे. मात्र सामन्याआधी रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे. के एल राहुल पाठोपाठ टीम इंडियातील आणखी एक स्टार खेळाडू टीममधून बाहेर गेला आहे.
रविंद्र जडेजा पहिला टी 20 सामना खेळणार नसल्याची चर्चा आहे. तो दुखापतीमधून अजून पूर्णपणे बरा न झाल्याने पहिला सामना खेळणार नाही. बीसीसीआयने सामन्याआधी तो न खेळण्याचं कारणही सांगितलं आहे.
बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रविंद्र जडेजा अजूनही फिट नाही. त्यामुळे तो टी 20 सीरिजमधूनही बाहेर जाण्याची शक्यता आहे. मेडिकल टीम जडेजाच्या हेल्थवर लक्ष ठेवून आहे. जडेजा लवकर बरा व्हावा आणि मैदानात खेळताना दिसावा यासाठी क्रिकेटप्रेमी प्रार्थना करत आहेत.
जडेजाला लवकर मैदामात उतरवण्याची घाई BCCI ला करायची नाही. कारण टीम इंडियाचं शेड्युल सध्या भरगच्च आहे. महत्त्वाच्या सामन्यांसाठी जडेजाला टीममध्ये उतरवणं भाग आहे. त्यामुळे BCCI त्याच्याबाबत सध्या कोणतीही जोखीम पत्करत नाही.
भारताला ऑगस्टमध्ये आशिया कप खेळायचा आहे. त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आणि वन डे सीरिज खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.
जडेजा हा टीम इंडियासाठी हुकमी एक्क आहे. त्याच्याकडे सामना फिरवण्याचं कौशल्य आहे. जडेजाला सध्या कोणतंही ट्रेनिंग करण्याची परवानगी नाही. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तो टी 20 सीरिजमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे.