Rohit Sharma: गुरुवारी अफगाणिस्तानविरूद्धच्या टी-20 सिरीजला सुरुवात झाली आहे. भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये 3 टी-20 सामन्यांची सिरीज खेळवली जातेय. या सिरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने या सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी देखील घेतली. मात्र या सामन्यात सर्वात चर्चेचा विषय ठरला तो रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या रन घेताना झालेला गोंधळ. या गोंधळामुळे रोहित शर्माला त्याची विकेट गमवावी लागली. अखेर सामना संपल्यानंतर रोहितने यावर भाष्य केलं आहे.
अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्मा खूश दिसून आला. यावेळी पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये बोलताना रोहित म्हणाला, मैदानावर खूप थंडी होती. ज्यावेळी बॉल तुमच्या बोटाच्या टोकावर लागते तेव्हा सहाजिकच तुम्हाला वेदना होतात. जेव्हा बॉल माझ्या बोटांना लागला तेव्हा मी माझ्या बोटांना काही जाणवलं नाही. या ठिकाणची परिस्थितीत सोपी नव्हती मात्र आमच्या स्पिनर गोलंदाजांनी चांगली कमगिरी केली.
टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये गिलच्या गोंधळामुळे रोहित शर्माला विकेट गमवावी लागली. यासंदर्भात बोलताना रोहित शर्मा म्हणाला, खरं सांगायचं तर अशा गोष्टी म्हणजे रन आऊट होत राहतात. ज्यावेळी अशी घटना घडते तेव्हा तुम्ही निराश होता. कारण तुमची तिथे उभं राहून खेळण्याची इच्छा असते आणि टीमसाठी रन करायचे असतात. मला असं वाटतं गिलने एक चांगली खेळी खेळावी, मात्र तो आऊट झाला.
प्रत्येक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही. दुबे आणि जितेश शर्मा या दोघांनी चांगली फलंदाजी केली. याशिवाय तिलक वर्मा आणि रिंकू देखील उत्तम फॉर्ममध्ये आहेत, असं म्हणत रोहितने टीममधील खेळाडूंचं कौतुकंही केलंय.
अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी-20 सामना जिंकत टीम इंडियाने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 14 महिन्यांच्या कालावधीनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरली होती. या सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमवून 158 रन्स केले. यावेळी टीम इंडियाला विजयासाठी 159 रनचं आव्हान मिळालं. टीम इंडियाच्या शिलेदारांनी हे आव्हान भारताने 17.3 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमवून सामना जिंकला.