Viral Video: बांगलादेश क्रिकेट संघात (Bangladesh Cricket Team) शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) हा सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे यात काही वाद नाही. बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार असणारा शाकिब अल हसन अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. आपल्या जबरदस्त खेळीमुळे ओळख निर्माण करणारा शाकीब अल हसन अनेकदा आपल्या स्वभावामुळे मात्र अडचणीत आला आहे. मैदानासह अनेक खासगी आयुष्यातही शाकिबच्या रागीत स्वभावाची चुणूक पाहायला मिळाली आहे. दरम्यान नुकताच असा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, ज्यामध्ये शाकिबचा संयम सुटल्याचं दिसत आहे.
शाकिब अल हसनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाकिबला चाहत्यांनी घेरल्याचं दिसत आहे. मात्र यावेळी संयम सुटल्याने शाकिबने चक्क एका चाहत्याला मारहाण केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
व्हिडीओत शाकिबला चाहत्यांना गराडा घातल्याचं दिसत आहे. खूप गर्दी असल्याने शाकिबला धक्का लागत होता. चालणंही कठीण असल्याने शाकिब गर्दीतून वाट काढत निघला होता. दरम्यान यावेळी एका चाहत्याने त्याची टोपी काढून घेतली. टोपी काढून घेतल्याने संतापलेल्या शाकिबने तीच टोपी घेत चाहत्याला मारहाण केली आणि नंतर गाडीत जाऊन बसला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
शाकिबने याआधी अनेकदा वाद निर्माण केला आहे. मैदानातील सामन्यांसह खासगी आयुष्यातीलही अनेक गोष्टींमुळे तो वादात अडकला आहे.
दरम्यान सध्या शाकिब इंग्लंडविरोधातील मालिकेत व्यग्र आहे. त्याच्याकडे संघाचं नेतृत्त्व आहे. शाकिबच्या नेतृत्वात बांगलादेश संघाने 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. या सामन्याबद्दल बोलताना शाकिबने सांगितलं की "ज्याप्रकारे आम्ही खेळलो ते जबरदस्त होतं. संघासाठी अजून काही बोलू शखत नाही. गोलंदाजी करताना कोणीही घाबरलं नाही. आपण काय करायचं आहे याची प्रत्येकाला जाण होती. सर्व गोलंदाजांनी ठरल्याप्रमाणे गोलंदाजी केली. काही झेल सोडले असता सर्वांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. हेच आम्हाला करायचं आहे".
“T20 मध्ये जेव्हा तुम्ही जास्त विचार करत नाही, तेव्हा चांगली कामगिरी करता. हेच वातावरण आम्ही ड्रेसिंग रूममध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही खूप चांगली सुरुवात आहे. 2024 चा विचार केल्यास, आम्ही वेस्ट इंडिजमध्ये विश्वचषक खेळणार आहोत. आपण येथून पुढे चांगला संघ तयार करू शकतो”, असं शाकिबने म्हटलं आहे.
याआधी बांगलादेश संघाने इंग्लंडविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 ने गमावली.