नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ रननी विजय झाला. कर्णधार विराट कोहली आणि विजय शंकर भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. विराट कोहलीनं त्याच्या वनडे कारकिर्दीतलं ४०वं शतक झळकावलं. तर विजय शंकरनं ४१ बॉलमध्ये ४६ रन केले. यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला ११ रनची गरज असताना विजय शंकरनं भारताला सामना जिंकून दिला.
शेवटच्या ३ ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २१ रनची गरज होती. यावेळी बुमराहनं ४८वी ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये बुमराहनं फक्त १ रन दिली. कोहलीनं ४९व्या ओव्हरसाठी शमीच्या हातात बॉल दिला. या ओव्हरमध्ये शमीनं ९ रन दिले. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११ रनची आवश्यकता होती. विजय शंकरनं या ओव्हरच्या ३ बॉलमध्ये फक्त २ रन देऊन २ विकेट घेतल्या.
मॅच संपल्यानंतर कर्णधार कोहली म्हणाला '४६वी ओव्हर मी विजय शंकरला देणार होतो. पण धोनी आणि रोहितनं मला बुमराह-शमीसोबतच कायम राहायला सांगितलं. जर विकेट मिळाल्या तर आपण मॅचमध्ये कायम राहू, असं त्यांना वाटत होतं, आणि शेवटी असंच झालं. शंकरनं अचूक टप्प्यावर बॉलिंग टाकली, याचा आम्हाला फायदा झाले. रोहित हा टीमचा उपकर्णधार आहे. त्याच्याकडून सल्ला घेणं नेहमीच चांगलं वाटतं. तर धोनी बऱ्याच कालावधीपासून हे काम करत आहे.'
शेवटच्या काही ओव्हरमध्ये शानदार बॉलिंग करणाऱ्या जसप्रीत बुमराहचंही कोहलीनं कौतुक केलं. 'बुमराह चॅम्पयिन बॉलर आहे. एका ओव्हरमध्ये २ विकेट घेऊन बुमराहनं मॅच आमच्या बाजूनं फिरवली. अशा मॅचमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. वर्ल्ड कपमध्येही आम्हाला अशाच प्रकारच्या मॅच खेळाव्या लागू शकतात. ही खेळपट्टी केदार जाधवच्या बॉलिंगसाठी योग्य होती. शेवटच्या ओव्हरमध्ये केदार जाधवला बॉलिंग करायची होती', असं विराटनं सांगितलं.
वनडे क्रिकेटमध्ये ४०वं शतक करण्यावरही विराटनं प्रतिक्रिया दिली. '४०वं शतक ही फक्त संख्या आहे. तुम्ही जेव्हा मॅच जिंकता तेव्हा चांगलं वाटतं. मी बॅटिंगला उतरलो, तेव्हा परिस्थिती बिकट होती. माझ्याकडे पूर्ण इनिंग बॅटिंग करण्याशिवाय पर्याय नव्हता. बॉलरच्या कामगिरीमुळे जास्त खुश आहे', असं वक्तव्य विराटनं केलं.