नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली सध्या 'सातव्या आस्मानात' आहे.
प्रत्येक मॅचमध्ये तो वेगवेगळे रेकॉर्ड करत असतो. 'माझा रेकॉर्ड तोडण्याची क्षमता विराटमध्ये आहे,' असे खुद्द मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेच सांगितलेय. दरम्यान विराट आता वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू व्हीहीयन यांचा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.
आजपासून इंडिया आणि साऊथ आफ्रिकेदरम्यान टी २० सामन्याला सुरूवात होत आहे. या दरम्यानही तो नवनवे रेकॉर्ड करेल अशी त्याच्या फॅन्सना आशा आहे. कोहलीचा ताजा फॉर्म पाहता तो वेस्ट इंडिजचा महान खेळाडू व्हीव्हीयन रिचर्डस यांचा एका दौऱ्यातील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
आफ्रिका दौऱ्यात विराटची बॅट चांगलीच तळपली. कसोटी मालिकेमध्ये विराटने २८६ आणि एकदिवसीय मालिकेमध्ये १८६.०० च्या जबरदस्त सरासरीनं ५५८ धावा केल्या. दोन्ही मालिकेत मिळून विराटच्या ८४४ धावा झाल्या आहेत.
एकाच दौऱ्यात १००० धावा पूर्ण होण्यासाठी विराटला १५६ धावांची गरज आहे. असे केल्यास व्हीव्हीयन रिचर्डस यांच्यानंतरचा तो दुसरा खेळाडू ठरेल. एकाच दोऱ्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावे होणार आहे.