World Cup 2023 64 Runs In 14 Balls: उत्तर प्रदेश टी-20 लीगमधील 16 वा सामना नोएडा सुपर किंग्स आणि कानपूर सुपरस्टार्सच्या संघादरम्यान खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये नोएडा सुपर किंग्जने सहज विजय मिळवला. नोएडाच्या संघाने कानपुरच्या संघाला 8 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यामध्ये भारतीय संघातून सध्या बाहेर असलेल्या एका खेळाडूने तुफानी खेळी करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. ज्या खेळाडूबद्दल आपण बोलत आहोत तो खेळाडू म्हणजे आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार नीतिश राणा! (Nitish Rana) नितिश राणाने सुपर किंग्जच्याविरोधात 46 चेंडूंमद्ये 186 च्या स्ट्राइक रेटने तब्बल 86 धावा केल्या.
नोएडा सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय अगदी योग्य ठरला. कानपुर सुपरस्टार्सच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 165 धावा केल्या. या धावा करताना त्यांचे 7 खेळाडू बाद झाले. सलामीला आलेल्या अंश यादवने 32 धावा केल्या. तर दुसरा सलामीवीर सौरव दुबे भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्याशिवाय समीर रिजवीने 37, आकाशदीपने 31 आणि संदीप तोमरने 40 धावा केल्या.
165 धावांचा पाठलाग करताना नोएडा सुपरकिंग्जच्या संघाने 19 व्या षटकामध्येच विजयाला गवसणी घातली. सलामीवीर म्हणून आलेल्या अल्मास शौकतने 55 धावांची खेळी केली. नीतिश राणा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 46 चेंडूंमध्ये 86 धावा केल्या. त्याने या खेळीमध्ये 10 चौकार आणि 4 षटकार लगावले. म्हणजे त्याने केवळ 14 चेंडूंमध्ये चौकार-षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. या स्पर्धेत मागील 3 डावांमध्ये त्याने 26 चेंडूंमध्ये नाबाद 64, 49 चेंडूंमध्ये 58 आणि 46 चेंडूंमध्ये 86 नाबाद धावा केल्या आहेत.
नीतिश राणा मागील 2 वर्षांपासून भारतीय संघामध्ये खेळलेला नाही. त्याने श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र त्या सामन्यानंतर त्याला पुन्हा अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी मिळाली नाही. त्या सामन्यात त्याला 14 चेंडूंमध्ये 7 धावा करता आल्या होत्या. नीतिश राणाचा समावेश भारताच्या विश्वचषकाच्या संघातही नाही. अनेक खेळाडूंची चर्चा असताना नीतिश राणाच्या नावाची साधी चर्चाही होताना दिसली नाही. अचानक त्याला संधी नाकारण्यामागील कारण अस्पष्ट असलं तरी त्याने उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये गोलंदाजांची चांगलीच धुलाई केल्याचं दिसून आलं. तो मागील 2 वर्षांपासून आयपीएलबरोबरच स्थानिक स्तरावरील स्पर्धाही खेळतो.
नक्की वाचा >> विराट कोहलीसंदर्भात हरभजन सिंगची Double Meaning कमेंट! म्हणाला, 'आम्ही अनेकदा मैदानात...'
नीतिश राणा इंडियन प्रिमिअर लिगमध्ये कर्णधार म्हणूनही खेळला आहे. श्रेयस अय्यर जायबंदी झाल्याने कोलकाता नाइट रायडर्सच्या संघ व्यवस्थापनाने नेतृत्वाची धूरा नीतिश राणाच्या खांद्यावर दिली होती. मात्र नीतिश राणाला कर्णधार म्हणून छाप पाडता आली नाही. आयपीएल 2023 मध्ये नीतिश राणाच्या नेतृत्वाखाली कोलकात्याच्या संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये 10 पैकी 7 व्या क्रमाकांवर राहिला.