World Cup 2023: वर्ल्डकप 2023 च्या 33 व्या सामन्यात (World Cup) भारताने श्रीलंकेचा (Ind vs SL) 302 धावांनी पराभव केला. या विजयानंतर जगभरातील अनेक माजी क्रिकेटपटू टीम इंडियाचे कौतुक केलं. दुसरीकडे पाकिस्तानचा माजी क्रिकेटर हसन रझाने (hasan raza) भलताच दावा केला होता. मुंबईत गुरुवारी श्रीलंकेवर मोठा विजय मिळवल्यानंतर हसन रझा यांनी भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांवर धक्कादायक टिप्पणी केली होती. या सामन्यात चेंडूसोबत छेडछाड झाल्याचा आरोप हसन रझांनी केला होता. त्यांच्या आरोपांवरुन मोठा गदारोळ उडाला. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हे (wasim akram) भारतीय वेगवान गोलंदाजांवर होत असलेल्या टीकेमुळे चांगलाच संतापला आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू हसन रझा यांनी बीसीसीआय आणि आयसीसीवर भारतीय गोलंदाजीदरम्यान चेंडू बदलल्याचा आरोप केला होता. यावर वसीम अक्रमने रझा यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलवर बोलताना यजमानांना विरोधी संघापेक्षा वेगळा चेंडू मिळाला आणि त्यामुळेच भारतीय वेगवान गोलंदाजांना अतिरिक्त स्विंग मिळत होता. हसन रझा यांनी असा दावा केल्यानंतर जगभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
काय म्हणाले होते हसन रझा?
"जेव्हा भारताचे खेळाडू फलंदाजी करत असतात तेव्हा ते खरोखरच चांगली फलंदाजी करतात. पण जेव्हा भारत गोलंदाजी करतो तेव्हा अचानक चेंडूचं नाटक सुरू होते. सात ते आठ डीआरएसचे निर्णय असे होते जे संशयास्पद होते सिराज आणि शमी ज्या पद्धतीने चेंडू स्विंग करत होते, त्यावरून असे वाटत होते की, आयसीसी किंवा बीसीसीआय त्यांना वेगवेगळे चेंडू देत आहेत. त्या चेंडूची चौकशी होणं गरजेचं आहे. स्विंगसाठी बॉलवर कोटिंगचा अतिरिक्त थर देखील असू शकतो," असे हसन रझा म्हणाले होते.
हसन रझा यांच्या या दाव्यानंतर वसीम अक्रम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका पाकिस्तानी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्रम यांनी हसन रझांवर टीका केली. "गेल्या काही दिवसांपासून मी याबद्दल वाचत आहे. या लोकांकडे जे काही आहे तेच मला हवे आहे...हे विनोदी वाटते...कारण त्यांचे डोकं जागेवर नाही...तुम्हाला स्वतःचा अपमान करायचाच आहे. पण आमचाही अपमान करू नका," असे अक्रम यांनी म्हटलं आहे.
Legendary pacer @wasimakramlive comments on #HasanRaza's statement on Indian bowlers, being given different balls to bowl.#ASportsHD #ARYZAP #CWC23 #ThePavilion #ShoaibMalik #MoinKhan #FakhreAlam #MisbahulHaq #AskThePavilion pic.twitter.com/uJ9YU9V745
— ASports (@asportstvpk) November 3, 2023
चेंडू कसा निवडला जातो?
वसीम अक्रमने सामन्यापूर्वी चेंडू कसा निवडला जातो हेदेखील यावेळी सांगितले. 'ही खूप साधी गोष्ट आहे. अंपायर आधी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे 12 चेंडूंचा बॉक्स घेऊन जातो आणि मग त्यातून ते त्यांचा पहिला आणि दुसरा पसंतीचा चेंडू निवडतात. त्यानंतर उरलेले चेंडू दुसऱ्या संघाकडे जातात आणि ते त्यांच्या आवडीचे दोन चेंडू निवडतात. या संपूर्ण प्रक्रियेत चारही पंच आणि सामनाधिकारी यांचाही सहभाग असतो. ते चेंडू मैदानावरील अम्पायरकडे दिले जातात,' असे वसीम अक्रमने सांगितले.