'..तर भारताने जिंकला असता 2023 चा World Cup'; केएल राहुलने स्वत:लाच दिला दोष

KL Rahul On His Biggest Regret In Cricket: क्रिकेट कारकिर्दीमधील सर्वात मोठी खंत कोणत्या गोष्टीची वाटते यासंदर्भातील प्रश्न के. एल. राहुलला विचारण्यात आला होता. आर. अश्विनने विचारलेल्या या प्रश्नावर के. एल. राहुल मोकळेपणे व्यक्त झाला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 19, 2024, 07:44 AM IST
'..तर भारताने जिंकला असता 2023 चा World Cup'; केएल राहुलने स्वत:लाच दिला दोष title=
के. एल. राहुलने आर. अश्विनच्या शोमध्ये बोलताना व्यक्त केलं मत

KL Rahul On His Biggest Regret In Cricket: भारतीय संघातील विकेटकीपर बॅट्समन के. एल. राहुलने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील सर्वात वाईट कोणत्या गोष्टीबद्दल वाटतं यासंदर्भातील खुलासा केला आहे. के. एल. राहुलने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील सर्वात वाईट गोष्टीसंदर्भात बोलताना 19 नोव्हेंबर 2023 चा उल्लेख केला आहे. याच दिवशी भारतीय संघ अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. 

के. एल. राहुलने सांगितली त्याच्या आयुष्यातील एक खंत

भारताने वर्ल्डकपमध्ये सलग 10 सामने जिंकल्यानंतर अंतिम सामन्यात भारताला पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने पराभूत केलं होतं. 2011 नंतर तब्बल 12 वर्षांनी घरच्या मैदानावर वर्ल्डकप जिंकण्याचं भारताचं स्वप्न यामुळे भंग पावलं होतं. या घटनेला आता जवळपास सहा महिन्यांच्या आसपासचा कालावधी उलटला असला तरी चाहत्यांबरोबरच क्रिकेटपटूंनाही हा पराभव आजही जिव्हारी लागत असल्याचं दिसत आहे. याचीच प्रचिती के. एल. राहुलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आली. के. एल. राहुलने वर्ल्डकप फायनलच्या दिवसाठी आठवण काढताना क्रिकेट कारकिर्दीमध्ये सर्वाधिक खंत कोणत्या गोष्टीची वाटते याबद्दल भाष्य केलं. सध्या आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाचं नेतृत्व करणारा के. एल. राहुल रविचंद्रन अश्विनच्या युट्यूब चॅनेलवरील शोमध्ये सहभागी झाला होता. आपण त्या सामन्यात चांगली खेळी केली असती तर भारत वर्ल्डकप जिंकला असता असं के. एल. राहुल म्हणाला.

के. एल. राहुल म्हणाला, 'तेव्हा मी संभ्रमात होतो'

भूतकाळामध्ये परत जाण्याची संधी मिळाली तर कोणती एक गोष्ट बदलायला आवडेल असा प्रश्न अश्विनने के. एल. राहुलला विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना के. एल. राहुलने टाइम मशीनमधून भूतकाळात जाऊन एक चूक सुधारण्याची संधी मिळाली तर वर्ल्डकपमधील खेळी सुधारेल असं म्हटलं. "ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्डकप फायनलमध्ये स्टार्कची गोलंदाजी खेळून काढावी की त्यावर फटकेबाजी करावी यासंदर्भात मी संभ्रामत होतो. तो रिव्हर्स स्वींग टाकत असल्याने त्या गोलंदाजीच्या अँगलमध्ये फलंदाजी करणं कठीण होतं," असं के. एल. राहुल म्हणाला.

नक्की वाचा >> धोनी T20 World Cup खेळणार? रोहितच्या विधानाने चर्चेला उधाण; म्हणाला, 'तो अमेरिकेला..'

...तर भारताने वर्ल्डकप जिंकला असता

केएल राहुलने स्वत:लाच दोष देत वर्ल्डकप संदर्भात भाष्य केलं आहे. "फटकेबाजी करावी की जपून खेळावं या गोंधळात बॅटची कड लागून झेल गेला आणि मी सामन्यातील महत्त्वाच्या क्षणी बाद झालो. त्यावेळेस मला वाटलं की मी अजून काही वेळ खेळलो असतो आणि उरलेल्या 12 ओव्हरपर्यंत फलंदाजी केली असती तर भारताच्या धावसंख्येत 30 ते 40 धावांची भर पडली असती आणि वर्ल्डकप आपल्या (भारताच्या) हातात असता. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकला असता. मात्र त्यावेळी विकेट फेकल्याची खंत मला आजही जाणवते," असं के. एल. राहुलने कबुल केलं.

काय होता स्कोअर?

वर्ल्डकप फायनलमध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 240 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हीस हेडने केलेल्या 137 धावांच्या जोरावर हा सामना 43 ओव्हरमध्येच जिंकला. या सामन्यात के. एल. राहुलने 107 बॉलमध्ये 66 धावांची खेळी केली होती. तो या सामन्यात भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.