Maruti suzuki cars price : कुटुंब वाढत गेलं, पगार वाढले आणि आर्थिक सुबत्ता आली की अनेक मंडळी अगदी मध्यमवर्गीय कुटुंबांमध्येसुद्धा हल्ली कार खरेदीसाठीचा अट्टहास पाहायला मिळतो. मागील काही वर्षांमध्ये किमान चार ते पाचजणांची आसनक्षमता असणारी कार असणं हा जीवनशैलीचा भाग नसून काही कुटुंबांनी गरज म्हणूनही कार खरेदी केली आहे. मध्यमवर्गीयांच्या गरजा आणि त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता त्यांच्या अपेक्षित गरजांची पूर्तता करत मारुती सुझूकी (Maruti suzuki) या कंपनीनं देशात एकाहून एक सरस आणि विविध दरांमध्ये उपलब्ध होती अशा कार उपलब्ध करून दिल्या.
येत्या काळात मात्र कार खरेदीचं स्वप्न काही अंशी महागणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे. सर्व स्तरांवर वाढलेला महागाईचा आकडा पाहता मारुती सुझूकीनं 1 फेब्रुवारीपासून विविध वाहनांच्या किमतीत कमाल 32500 रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, गुरुवारी तो अधिकृतपणे जाहीरही केला.
वाहनांचा उत्पादनखर्च अधिक असल्यामुळं आर्थिक जुळवाजुळ आता शक्य नसल्याचं कारण पुढे करत कंपनीनं दरवाढ रोखण्यासाठी कैक प्रयत्न केल्याचंही मारुती सुझूकीकडून स्पष्ट करण्यात आलं. थोडक्यात नव्यानं कार खरेदी करण्यासाठी पैसे जोडले असतील किंवा कार खरेदीचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्या खर्चाचं गणितच हा एक निर्णय बदलणार आहे हेच आता स्पष्ट होतंय.
वॅगन आर- 15000 रुपये
स्विफ्ट- 5000 रुपये
एसयुव्ही ब्रेझा, ग्रँड विटारा- अनुक्रमे 20000 आणि 25000 रुपये
अल्टो के- 19500 रुपये
एसप्रेसो- 5000 रुपये
बलेनो- 9000 रुपये
फ्रॉन्क्स- 5500 रुपये
कॉम्पॅक्ट सेडान श्रेणीतील कारचे दरही कंपनी 10000 रुपयांनी वाढवणार आहे. फेब्रुवारी महिन्यापासून ही दरवाढ लागू होणार असून, त्यामुळं कारचं स्वप्न पाहणाऱ्यांच्या खिशाला चाप बसणार असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे त्यामुळं येत्या काळात कार खरेदी करण्याचा विचार असाल तर जास्तीची रक्कम हाताशी ठेवणं कधीही उत्तम.