Man Sets Bar On Fire: मद्यपान केलेली व्यक्ती कधी काय करेल सांगता येत नाही, असं म्हणतात. असाच काहीसा प्रकार मॅक्सिकोमध्ये समोर आला आहे. मॅक्सिको देशातील सोनोरा आणि अॅरोझोना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या एका शहरातील बारला आग लावल्याप्रकरणी संक्षयित आरोपी म्हणून दारुड्याला अटक करण्यात आली आहे. बारला लागलेल्या आगीमध्ये एकूण 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. स्थानिक वेळेनुसार शनिवारी (22 जुलै 2023 रोजी) मध्यरात्रीनंतर 1 वाजून 33 मिनिटांनी हा बार आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
मॅक्सिकोमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या या व्यक्तीची बारमधून हकालपट्टी करण्यात आलेली. सॅन लुईस रिको कोलेरॅडो येथील बिअर हाऊस कॅण्टेनिया नावाच्या बारमधून या संक्षयित आरोपीला बार प्रशासनाने बाहेर काढलं होतं. या बारमधील महिलांबरोबर या व्यक्तीने अयोग्य वर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली होती.
मद्यधुंदावस्थेत या व्यक्तीने बारमधून बाहेर पडताना हातातील काही द्रव्य बारमध्ये फेकलं आणि त्यामुळे आग लागली. नंतर या आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण बारलाच आग लागली, असं सोनोराच्या अटॉर्नी जनरलने सांगितलं आहे. या आगीमध्ये एकूण 7 पुरुष आणि 4 महिलांचा होरपळून मृत्यू झाला. 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं सोनोरामधील सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. "या दुर्घटनेत बळी पडलेल्यांप्रती आणि त्यांच्या कुटुंबांप्रती आमच्या सहवेदना आहेत," असं येथील मेडिकल सेंटरने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
या बारला लागलेल्या आगीचे काही व्हिडीओ समोर आले असून आगीच्या ज्वाला शांत करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत असल्याचं यात पहायला मिळत आहे. या आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या सासऱ्यांनी, "या बारमध्ये आप्तकालीन दरवाजा नव्हता असं आम्हाला सांगण्यात आलं. बारला एकच दरवाजा होता आणि तो बंद झाला होता. कोणीतरी काहीतरी द्रव्य टाकलं आणि आग लागून ती पसरत गेली," अशी माहिती दिली. या दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्यांच्या नावांचा खुलासा करण्यात आलेला नाही. या इमारतीलाही प्रचंड नुकसान झालं असून पोलिसांनी हा भाग सध्या सील केला आहे.
सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करुन पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.