कोलंबो: आजपर्यंत आपण हनीमूनला जाणाऱ्या अनेक जोडप्यांचे भन्नाट किस्से ऐकले असतील. मात्र, सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या एका ब्रिटीश जोडप्याने या सगळ्यावर कडी साधत लोकांना चक्रावून टाकले आहे. गिना लायन्स आणि मार्क ली असे या दोघांचे नाव आहे.
गिना आणि मार्क यांनी जून महिन्यात लग्न केले होते. यानंतर ते हनीमूनसाठी श्रीलंकेत आले होते. यावेळी ते ज्या हॉटलेमध्ये उतरले होते ते संपूर्ण हॉटेलच या दोघांनी विकत घेतले. या सगळ्यामागची कहाणी भन्नाट अशीच आहे.
हॉटेलमध्ये असताना पहिल्याच रात्री मार्क आणि गिना दोघांनी जवळपास १२ रमचे ग्लास रिचवले होते. साहजिकच दोघांनाही दारूची प्रचंड नशा चढली होती. यानंतर दोघांनी जे केले, ते ऐकून अनेकजण अवाक झाले. दारू प्यायल्यानंतर मार्क आणि गिनाला आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहोत, त्याचा भाडेकरार (लीज अॅग्रीमेंट) लवकरच संपत असल्याचे समजले.
तेव्हा दारूच्या नशेत असणाऱ्या मार्क आणि गिनाने थोडाही वेळ न दवडता तीन वर्षांसाठी हे हॉटेल लीजवर घेण्याचा निर्णय घेतला. दोघांनी नशेतच बिझनेस प्लॅन तयार केला आणि हॉटेल मालकाला या हॉटेलची ३० हजार पाऊंड म्हणजे जवळपास २९ लाख रुपयांची ऑफर दिली.
ही ऑफर हॉटेलच्या मालकालाही चांगलीच पसंत पडली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी मार्क आणि गिनाशी पुन्हा संपर्क साधला आणि हा करार निश्चित झाला. या सगळ्यामुळे सुरुवातीला नातेवाईकांनी मार्क आणि गिनाला वेड्यात काढले. मात्र, सुदैवाने सध्या हॉटलमध्ये अनेक पर्यटक असल्याने दोघांनाही चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे.