Couple In Shock After Buying This Rs 16 Crore Home: आपलंही एक छोटसं का असे ना घर असावं, असं प्रत्येक जोडप्याला वाटतं. मात्र ब्रिटनमधील एका जोडप्याला हेच स्वप्न पाहणं फारच महागात पडलं आहे. खरं तर त्याचं हे स्वप्न एक भयानस्वप्न म्हणून त्यांच्या समोर आलं. मार्टीन आणि सारा कॅटॉन या दोघांनी ब्रिटनमध्ये 1.5 मिलियन पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार 16 कोटी रुपये खर्च करुन 2014 साली एक छोटासा टुमदार बंगला विकत घेतला. मात्र या घरात प्रवेश केल्यानंतर हा बंगला आतून एखाद्या युद्धग्रस्त घरासारखा झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे या घरात अनेक मूलभूत सुविधाही नव्हत्या. जाहिरातीमध्ये या बंगल्यात लाकडी शिड्या, लायब्रेरी, ऐतिहासिक पद्धतीने काचकाम केलेल्या खिडक्या आहेत असा दावा करण्यात आलेला. मात्र घरात शिरल्यानंतर या दोघांना मोठा धक्काच बसला.
मार्टीन आणि साराने घेतलेलं हे घर पूर्वी डॉक्टर मार्क पेनी नावाच्या माणसाच्या मालकीचं होतं. जुन्या मालकाने घर सोडताना घराचे दरवाजे, खिडक्या, शेकोटीची जागा, नळ, विजेच्या तारा आणि जे जे शक्य होईल ते सारं काढून घेतलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या घरातील चारपैकी तीन बाथरुमची तोडफोड करुन त्यामधील बाथटब, कमोड यासारख्या गोष्टीही काढून घेण्यात आलेल्या. घरातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणून ज्या नावाने घर विकलं त्या लाकडी शिड्यांचीही तोडफोड करण्यात आल्याचं मार्टीन आणि साराला दिसून आलं.
16 कोटी रुपये आपण या घरासाठी दिलेत का असा प्रश्न आतून घर पाहिल्यानंतर मार्टीन आणि साराला पडला. त्यांनी या प्रकरणी कोर्टात खटला दाखल केला. तब्बल 9 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर कोर्टाने या घरातून काढून घेण्यात आलेल्या वस्तूंचा मोबदला देण्याचे आदेश दिले आहेत. 'डेली मेल'शी बोलताना सारा यांनी, "हा फारच वाईट अनुभव होता. घरावरुन वादळ घोंगावून गेल्याप्रमाणे घराची अवस्था झाली होती. आधीच्या मालकाने घरातील जवळपास एकूण एक वस्तू काढून घेतली होती. अगदी भिंतीच्या टाइल्स सुद्धा काढून घेतल्या. या अशा वृत्ती मागील मानसिकता मलला कळत नाही. तुम्ही एवढं क्रूरपणे एखाद्याबरोबर वागू शकता हे फार धक्कादायक आहे," असं मत व्यक्त केलं. या घरात शिरल्यानंतर आम्ही जे काही पाहिलं ते म्हणजे आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता, असं या दोघांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> ...अन् त्याने ₹58561750000000 ची संपत्ती गमावली; अंबानी, अदानी, बिल गेट्सपेक्षाही होता श्रीमंत पण..
पैशांचा व्यवहार करण्यापूर्वी आणि झाल्यानंतरही घर प्रत्यक्षात पाहण्यासाठी मार्टीन आणि सारा यांनी अनेकदा प्रयत्न केले. मात्र त्यांना हे घर विकणारा आधीचा मालक डॉक्टर मार्क पेनी काही ना काही कारण सांगून प्रत्यक्षात घर बाघायला नेण्यास टाळाटाळ करायचा. घरात काहीतरी गडबड आहे असं वाटतं असतानाही त्यांनी व्यवहार केला. मात्र त्यानंतर समोर जे काही पाहिलं त्यामुळे त्यांना धक्काच बसला. या दोघांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी डॉक्टर मार्क पेनीला अटक केली. चोरी आणि संपत्तीला नुकसान पोहचवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. पोलिसांनी एप्रिल 2015 मध्ये मार्ककडून काही वस्तू ताब्यात घेतल्या. मात्र पुराव्या आभावी त्याला सोडून देण्यात आलं.
मात्र पुन्हा एकदा खटला दाखल करुन तब्बल 9 वर्ष संघर्ष केल्यानंतर मार्टीन आणि सारा यांना न्याय मिळाला. या सुनावणीला आधीचा मालक कधीच उपस्थित राहिला नाही. आपण 1 हजार मैलांवर राहतो एवढ्या लांब येणं शक्य नाही असं आधीच्या मालकाचं सांगणं होतं. तसेच आपण काहीच केलं नसून आपल्याविरुद्ध अफवा पसरवत असल्याचा दावा त्याने केलेला. न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत त्याला मार्टीन आणि सारा यांना भरपाई देण्याचे आदेश दिलेत.