नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाकिस्तान सरकारने फरार घोषीत केलं आहे. जामिनावर असताना योग्य ती वैद्यकीय कागदपत्र सादर न केल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून ७० वर्षीय शरीफ लंडनमध्ये वैद्यकीय उपचार घेत आहेत. लाहोर हायकोर्टाने त्यांना एक महिना परदेशात उपचार घेण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र एक महिन्यानंतरही ते पाकिस्तानात परतले नाहीत.
शरीफ यांनी जामिनासाठी असलेल्या अटी व शर्थींचे उल्लंघन केल्याचं देखील पाकिस्तान सरकारने म्हटलं आहे. पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कॅबिनेट बैठकीत शरीफ यांना फरार घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पाकिस्तानचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या नवाज़ शरीफ आज भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. 19 नोव्हेंबरला नवाज शरीफ उपचारासाठी लंडनला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ शाहबाज़ शरीफ देखील होता. शाहबाज़ शरीफ हे विरोधीपक्ष नेते आहेत.
२३ डिसेंबरला नवाज़ शरीफ यांनी लाहोर हायकोर्टात पुन्हा अवधी वाढवून देण्याची मागणी केली होती. यावर निर्णय घेण्यासाठी पंजाब सरकारने एक समिती नेमली होती. पण समितीने यासाठी मेडिकस रिपोर्ट मागितले होते. समितीने म्हटलं की, नवाज शरीफ हे लंडनमध्ये कोणत्याही रुग्णालयात दाखल झालेले नाहीत.