Israel-Hamas War: हातावर नावं का लिहिताहेत गाझातील मुलं? कारण ऐकून अंगावर काटा येईल

इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील युद्धाची दाहकता किती आहे याचा अंदाज तेथील नागरिकांना पाहिल्यावरच येतो. इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक ठार होत आहेत की, मृतदेह ओळखता यावेत यासाठी मुलांच्या हातावर नावं लिहिली जात आहेत.   

शिवराज यादव | Updated: Oct 25, 2023, 01:27 PM IST
Israel-Hamas War: हातावर नावं का लिहिताहेत गाझातील मुलं? कारण ऐकून अंगावर काटा येईल title=

इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील हमासच्या दहशतवाद्यांमध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे दोन्ही देशातील नागरिकांना मोठे परिणाम भोगावे लागत आहेत. हजारो नागरिक युद्धात ठार मारले गेले असून, अनेकजण निर्वासित झाले आहेत. दरम्यान, युद्धाची दाहकता कितपत आहे याचा अंदाज पॅलेस्टाइनमधील लहान मुलांकडे पाहिल्यावर येत आहे. याचं कारण मृत्यू होण्याआधीच ते उद्या मृत पावले तर ओळखता यावेत यासाठी त्यांच्या हातावर नाव लिहिलं जात आहे. 

इस्रायलने जर उद्या हवाई हल्ला केला आणि त्यात मृत्यू झाला तर ओळखता यावं यासाठी पॅलेस्टाइनमधील लहान मुलांच्या हातावर नावं लिहिली जात आहेत. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत मोठी मुलं त्यांच्या मित्रांची नावे फील्ट-टिप पेनमध्ये अरबी लिपीत लिहिताना दिसत आहेत.

एक्सवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओत मुलगा 'मी अजिबात मरणार नाही' असं बोलताना ऐकू येत आहे. 

अल-अक्सा शहीद रुग्णालयाचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ अब्दुल रहमान अल मसरी यांनी सीएनएनला सांगितलं की, पालकांना काहीही होऊ शकतं आणि कोणीही त्यांच्या मुलांना ओळखू शकणार नाही अशी भीती वाटत होती. दरम्यान, रुग्णालयातील दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की, "अनेक पालकं हवाई हल्ल्याच्या तसंच आपण बेपत्ता होण्याच्या भीतीने आपल्या पायांवर त्यांच्या मुलांची नाव लिहित असल्याचं आमच्या निदर्शनास आलं". गाझानध्ये सुरु झालेला हा एक नवा प्रकार आहे. 

डॉ अल मसरी पुढे म्हणाले की, रुग्णालयात आणलेली अनेक मुलं इतकी जखमी आहेत की त्यांची ओळख पटवणे अशक्य आहे. केवळ त्या नावामुळे त्यांची ओळख पटते. UNICEF ने दिलेल्या माहितीनुसार, 18 दिवसांपूर्वी सुरु झालेल्या युद्धानंतर दिवसाला 400 लहान मुलांचा मृत्यू किंवा जखमी होत आहेत. 

7 ऑक्टोबरपासून सुरु आहे युद्ध

7 ऑक्टोबरला हमासने गाझा पट्टीवरुन इस्त्रायलवर 5 हजारांहून अधिक रॉकेट्स डागत हल्ला केला होता. यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरोधात युद्धाची घोषणा केली होती. 

दोन आठवड्यांच्या युद्धात गाझा पट्टी पूर्णपणे उद्धवस्त झाली आहे. पॅलेस्टाइनचे विदेश मंत्री रियाल अल-मलिकीने दावा केला आहे की, इस्त्रायलच्या बॉम्बहल्ल्यात आतापर्यंत 5700 हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. यामध्ये 2300 हून अधिक मुलं आणि 1300 हून अधिक महिला आहेत. तर हमासच्या हल्ल्यात इस्त्रायलमधील 1400 नागरिक ठार झाले आहेत. हमासने 200 हून अधिक नागरिकांना ओलीस ठेवलं आहे.