IT Jobs Cognizant and Microsoft news : मागील काही वर्षांमध्ये IT क्षेत्रातील नोकऱ्यांना जागतिक आर्थिक मंदीचा फटका बसताना दिसत आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी तडकाफडकी नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं देश- विदेशातील हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली. एकिकडे आर्थिक मंदी आणि अनेक देशांवर असणारं आर्थिक संकट शिवाय राजकीय परिस्थितीसुद्धा अशा निर्णयांमागचं मुख्य कारण असल्याचं पाहायला मिळतानाच आता दुसरीकडे आणखी एका नामवंत आयटी कंपनीनं कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा थेट इशारा दिला आहे.
LiveMint च्या वृत्तानुसार Cognizant च्या Work From Home करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीनं ऑफिसमध्ये येऊन काम करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत. वारंवार सूचना दिल्या जात असतानाही काही कर्मचारी अद्याप ऑफिसमध्ये रुजू झालेले नाहीत. त्यांच्याविरोधातच आता कंपनीनं ही कठोर भूमिका घेतली असून, त्यांना थेट नोकरीवरून काढण्याचाच इशारा दिला आहे.
कंपनी नियमांनुसार तुम्ही ऑफिसमध्ये येणं गरजेचं असल्याचं म्हणत त्यांनी असं न केल्या ही कृती कंपनीच्या नियमांचं उल्लंघन करणारी कृती मानली जाईल. ज्यामुळं कर्मचाऱ्यांना नोकरीलाही मुकावं लागू शकतं. दरम्यान कॉग्निझंटसाठी भारतातील कर्मचारीवर्ग महत्वाचा असून वार्षिक अहवालानुसार कंपनीतील 347,700 कर्मचाऱ्यांपैकी 254,000 कर्मचारी एकट्या भारतातील आहेत. थोडक्यात भारत हे कॉग्निझंटसाठी महत्त्वाचं केंद्र असून, आता कंपनीच्या या निर्णयाकडे भारतातील कर्मचारीसुद्धा गांभीर्यानं पाहताना दिसत आहेत.
दरम्यान, अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या तणावामुळं याचे थेट परिणाम आता इतर घटकांवर दिसू लागले आहेत. सध्या चीनमध्ये काम करणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या असंख्य कर्मचाऱ्यांवर याचे परिणाम होताना दिसत असून, कंपनीकडून या सर्व कर्मचाऱ्यांना इतर देशांमध्ये स्थलांतरित होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
वॉशिंग्टन जर्नलच्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्टकडून चीनमध्ये काम करणाऱ्या जवळपास 700 ते 800 कर्मचाऱ्यांना या सूचना दिल्या असून, त्यामधील अनेक कर्मचारी चीनचे नागरिक आहेत. प्रभावित कर्मचाऱ्यांना कंपनीनं सध्या अमेरिका, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड अशा देशांमध्ये स्थलांतरित होण्यास सांगितलं आहे.