नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर नाव आहे ते 'अमेझॉन'चे संस्थापक जेफ बेजोस... फोर्ब्सकडून मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या श्रीमंतांच्या यादीत यावेळी जेफ बेजोसच सर्वात श्रीमंत ठरलेत. बेजोस यांची एकूण संपत्ती १३१ अरब डॉलर आहे. परंतु, या यादीतील सर्वात तरुण चेहरा कोण? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे... काइली जेनर
फोर्ब्सच्या यादीत काइली जेनर 'सर्वात श्रीमंत तरुण व्यक्ती' ठरली आहे. काइली ही ९००० दशलक्ष डॉलरच्या कंपनीची मालकीण आहे... या कंपनीचं नाव आहे 'काइली कॉस्मेटिक्स'... सर्वात तरुण श्रीमंतांच्या यादीत काइलीनं 'फेसबुक'च्या मार्क झुकरबर्गलाही मागे टाकलंय. झुकरबर्गचा वयाच्या २३ व्या वर्षी अरबपती बिझनेसमनच्या यादीत समावेश झाला होता.
काइली जेनर ही टॉप मॉडल किम कार्दशियन हिच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. २१ वर्षांच्या काइलीनं तीन वर्षांपूर्वी 'काइली कॉस्मेटिक्स' या आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. गेल्या वर्षी या कंपनीनं ३६० दशलक्ष डॉलर विक्रीचा टप्पा गाठला होता.
भारतामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांनी आपलं नाव कायम ठेवण्यात यश मिळवलंय. जगातील श्रीमंतांच्या यादीत ते सहा पायऱ्या वर चढत १३ व्या स्थानावर दाखल झालेत. गेल्या वर्षी ती श्रीमंतांच्या यादीत १९ व्या क्रमांकावर होते. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती २०१८ साली ४०.१ अरब डॉलर होती. आता ती वाढून ५० अरब डॉलर (३.५ लाख करोड)वर पोहचलीय. 'फोर्ब्स'च्या यादीत भारतातील तब्बल १०६ व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे.
सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेल्या जेफ बेजोस यांची संपत्ती एका वर्षात १९ अरब डॉलरनं वाढून १३१ अरब डॉलरवर पोहचलीय. 'फोर्ब्स'च्या यादीत जेफ बेजोस यांच्यानंतर बिल गेटस आणि वॉरेन बफेट यांचा क्रमांक लागतो.