नवी दिल्ली : भारतीय कार्यक्रम आणि वाहिन्यांबर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तीन न्यायालयांच्या खंडपीठाने याविषयीचा निर्णय सुनावला. ज्याचं प्रतिनिधीत्व न्यायाधीश गुलजार अहमद यांनी केलं होतं, असं वृत्त Dunya News ने प्रसिद्ध केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या या निर्णयाच्या वेळी लाहोर उच्च न्यायालयाच्या निर्णयाला बाजूला सारत २०१६ चाच बंदीचा निर्णय कायम ठेवला. एएनआने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार यावेळी न्यायाधीश अहमद यांनी जनतेला या परिस्थितीतही भारतीय वाहिन्या आणि कार्यक्रम पाहावेसे वाटतात का, हा प्रश्न उपस्थित केला. तर, न्यायाधीश इलियाज-उल-एहसान यांनी उच्च न्यायलाला 'पर्मा'च्या (Pakistan Electronic Media Regulatory Authority) निर्णयात आणि अधिकारांमध्ये कोणताही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचं स्पष्ट केलं.
२०१६ मध्ये 'पर्मा'ने पाकिस्तानात भारतीय कार्यक्रम आणि वाहिन्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय सुनावला होता. भारतात पाकिस्तानी कलाकारंवर बंदी घालण्यात आल्यानंतर शेजारी राष्ट्रातही अशीच भूमिका घेतली गेल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, त्यानंतर २०१७ मध्ये लाहोर उच्च न्यायालयाने मात्र ही बंदी उठवण्यात आली होती. पण, उच्च न्यायालाच्या या निर्णयाविरोधातच 'पर्मा'कड़ून थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. ज्या धर्तीवर लाहोर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला बाजूला सारत 'पर्मा'च्याच भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करत पाकिस्तानमध्ये भारतीय वाहिन्या आणि सर्व कार्यक्रमांच्या बंदीचा निर्णय कायम ठेवला. याविषयीच्या पुढील सुनावणीची तारीख अद्यापही स्पष्ट करण्यात आली नसून न्यायालयाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयापूर्वी पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ट्विट करत बालाकोट हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानमध्ये वितरकांनी भारतीय चित्रपटांवर बंदी टाकल्याची माहिती दिली होती. त्याशिवाय पर्माला भारतीय जाहिरातींविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केलं होतं.
भारत- पाकिस्तान तणावामुळे झालेल्या या परिणामांचा फटका पाकिस्तान कला क्षेत्राला बसणार आहे. फक्त आर्थिकच नव्हे तर, कलाकारांच्या करिअरच्या दृष्टीनेही ही बाब अडचणीची ठरणार आहे. हीच परिस्थिती पुढच्या काळात कायम राहिली तर, त्याचे थेट परिणाम पाकिस्तानच्या चित्रपट विश्वावरही पडणार आहेत हे खरं. सोशल मीडिया आणि काही अहवालांच्या माहितीनुसार दरवर्षी पाकिस्तानमध्ये फक्त २० चित्रपटच साकारले जातात. तर भारतात, चित्रपट साकारण्याचं प्रमाण हे जवळपास १ हजारांच्या घरात आहे. त्यामुळे आता ही सारी आकडेमोडच गोंधळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.